छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित अबूझमाड क्षेत्रात संपर्काच्या साधनांची कमतरता आहे. परंतु, आता या भागात आदिवासी एका मिनी चित्रपटगृहात चित्रपटही पाहू शकतील. आदिवासींनी बाहेरील जगाशी जुळण्यासाठी केलेला हा पहिला प्रयत्न आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड पोलिसांनी नारायणपूर जिल्ह्यातील अबूझमाड क्षेत्रातील बासिंग गावात पहिले चित्रपटगृह सुरू झाले आहे. अशाच प्रकारच्या आणखी काही सुविधा विकसित करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

नारायणपूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र शुक्ला म्हणाले की, गुरुवारी या मिनी चित्रपटगृहाचा शुभारंभ झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक सहभागी झाले होते. त्यांनी सुपरहिट ‘बाहुबली’ हा चित्रपट पाहिला. बाहेरील जगताशी या लोकांनी जोडले जावे यासाठीचा हा प्रयत्न आहे. माओवाद्यांच्या हालचालीमुळे वंचित असलेल्या या घटकाला काही अंशी मदत होणार आहै.

ते म्हणाले, स्थानिक लोकांशी चर्चा केल्यानंतर १०० आसनक्षमता असलेल्या या चित्रपटगृहाला ‘बासिंग सिलेमा’ हे नाव देण्यात आले आहे. याचा गोंडी भाषेत अर्थ हा बासिंग सिनेमा असा होता. या चित्रपटगृहात लोक मोफत चित्रपट पाहू शकतात. विविध आदिवासी क्षेत्रासह अबूझमाडमध्ये टेलिव्हिजन आणि मोबाइल जवळपास नव्हतेच. या गावात आठवडी बाजार भरतो. हे वगळता गावात मनोरंजनाचे दुसरे कोणतेच माध्यम नाही.

नारायणपूर शहरातही कोणतेच चित्रपटगृह नाही. चित्रपटांशिवाय ग्रामस्थ आता डायरेक्ट टू होमच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर टेलिव्हिजन वाहिन्या पाहू शकतील.