तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी राज्यातील प्रमुख विरोधक असणाऱ्या भाजपाला थेट आव्हान दिलं आहे. रविवारी एके ठिकाणी बोलताना केंद्र सरकारने जर एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला राजकारणामध्ये प्रवेश करता येईल असा काही कायदा आणला तर मी लगेच राजकारण सोडून देईन, असं अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना अभिषेक बॅनर्जी यांनी माझ्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईल, असंही म्हटलं आहे. डायमंड हार्बर मतदारसंघातून खासदार अशलेल्या अभिषेक बॅनर्जी यांनी यांनी कुलताली विधानसभा मतदारसंघातील एका सभेला संबोधित करताना भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच कुटुंबातील एकाहून अधिक सदस्य राजकारणात येऊ शकत नाही अशा पद्धतीचा काही कायदा आणणार असतील तर पुढच्या क्षणी मी राजकीय आखाड्यातून बाहेर पडेन, असं अभिषेक बॅनर्जी यांनी यावेळी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदीही…,” शिवसेनेची खोचक टीका

“कैलाश विजयवर्गीय यांच्यापासून शुभेन्दु अधिकारींपर्यंत आणि मुकुल रॉय यांच्यापासून ते राजनाथ सिंह यांच्यापर्यंत भाजपा नेत्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य भाजपाच्या महत्वाच्या पदांवर आहेत. जर एका कुटुंबातील एकच सदस्य सक्रीय राजकारणामध्ये असण्याबद्दलचा कायदा केला तर तृणमूल काँग्रेस पक्षाकडून केवळ ममता मॅनर्जी राजकारणा असतील, असा मी शब्द देतो,” असं अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

आणखी वाचा- नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही – राहुल गांधी

भाजपा नेत्यांकडून वारंवार लुटारु या अर्थाने वारंवार होणाऱ्या उल्लेखावरही अभिषेक बॅनर्जी यांनी उत्तर दिलं आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध झाले तर मी सार्वजनिक पद्धतीने फासावर टकण्यासाठी तयार आहे, असंही अभिषेक बॅनर्जी म्हणाले आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शनिवारी व्हिक्टोरिया मेमोरियलमधील घटनेचा संदर्भ देत बॅनर्जी यांनी जय श्री रामच्या घोषणा मुद्दाम देण्यात आल्या. ममता यांनी भाषण देऊ नये म्हणून या घोषणा करण्यात आल्या, असं अभिषेक बॅनर्जी म्हणाले आहेत.

आणखी वाचा- ममतांसाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कपडा दाखवण्यासारखं; भाजपा नेत्याची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी एकाच मंचावर असतानाच जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्याने ममता यांनी भाषण देण्यास नकार दिला. “आम्हाला गर्व आहे की ममता बॅनर्जींनी सरकारी कार्यक्रमामध्ये अशाप्रकारे घोषणा देऊन नेताजींचा अपमान करण्याऐवजी त्याविरोधात आम्ही उभे राहिलो. बंगाल याला विरोध करण्यासाठी उभा राहिला,” असं अभिषेक बॅनर्जी म्हणाले आहेत. तुम्ही मंदिरांमध्ये, धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपल्या घरात हजारवेळा जय श्री रामच्या घोषणा द्याव्यात. मात्र जो कार्यक्रम नेताजींच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले त्यामध्ये अशाप्रकारे सरकारी व्यासपीठासमोर घोषणा देणं चुकीचं आहे, असंही अभिषेक बॅनर्जी म्हणाले.