तिहेरी तलाकविरोधात याचिका दाखल करणाऱ्यांपैकी एक इशरत जहाँ यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तिहेरी तलाक हे अवैधानिक आणि मुस्लीम महिलांसाठी सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे सांगत पश्चिम बंगालमधील हावड़ा येथील इशरत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

भाजपाचे पश्चिम बंगालचे सरचिटणीस सायंतन बसूंच्या हवाल्याने ‘एनडीटीव्ही’ने हे वृत्त दिले आहे. इशरत जहाँ हावडा येथील कार्यालयात येऊन भाजपात सहभागी झाल्याचे बसू यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या हावडा येथील शाखेने शनिवारी सन्मानित केले आणि त्यांना पक्षात प्रवेश दिला. इशरत यांचा गौरव करण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचेही बसू यांनी म्हटले.

तिहेरी तलाकविरोधात दाखल केलेल्या पाच याचिकाकर्त्यांपैकी इशरत जहाँ या एक आहेत. त्यांच्या पतीने दुबईमधून २०१४ मध्ये फोनवरच तीन वेळा ‘तलाक’ म्हणत त्यांना तलाक दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी २२ ऑगस्ट रोजी तिहेरी तलाक अयोग्य असल्याचा निकाल दिला होता. याप्रकरणी इशरत जहाँची अजून प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.