तिहेरी तलाक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने थेट हस्तक्षेप करण्यास नकार देत यासंबंधी सहा महिन्यांत संसदेत कायदा करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर सहा महिन्यांची बंदी असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तिहेरी तलाक प्रथेमुळे घटनेतील अनुच्छेद १४, १५, २१ आणि २५ चे उल्लंघन होत नाही, असेही सरन्यायाधीश जे. एस. खेहर म्हणाले. ही प्रथा घटनाबाह्य असल्याचे न्यायाधीश ललित, नरिमन आणि कुरियन यांनी निकाल देताना म्हटले आहे.

अनेक महिन्यांपासून तिहेरी तलाकचा मुद्दा चर्चेत होता. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला. केंद्र सरकारने तिहेरी तलाकसंबंधी संसदेत कायदा करावा, असे आदेश देतानाच यात थेट हस्तक्षेप करण्यास नकार दिला. राजकीय पक्षांनी यासंदर्भात निर्णय घेताना राजकारण बाजूला ठेवावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली. दरम्यान, निकाल देताना खंडपीठातील न्यायाधीशांमध्येच एकमत होऊ शकले नाही. तिहेरी तलाक प्रथा घटनाबाह्य असल्याचे मत न्यायाधीश ललित, नरिमन आणि कुरियन यांनी मांडले. तर या प्रथेमुळे घटनेतील कलम १४, १५, २१ आणि २५ चे उल्लंघन होत नसल्याचे मत सरन्यायाधीश खेहर आणि नाझीर यांनी मांडले. यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर मुस्लिम महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. मुस्लिम महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत आणि समर्थनही करतो, अशी प्रतिक्रिया याचिकाकर्त्या शायरा बानो यांनी दिली आहे.

LIVE UPDATES:

तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून स्वागत

तिहेरी तलाकसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांना समानतेचा अधिकार मिळाला आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे केंद्रीय मंत्री मनेका गांधींकडून स्वागत

मुस्लिम समाजातील महिलांची परिस्थिती समजून घ्यावी. न्यायालयाचा हा निर्णय स्वीकारून लवकरात लवकर यासंबंधी कायदा करावा: शायरा बानो

मुस्लिम महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आणि समर्थन करते: शायरा बानो

तिहेरी तलाकसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर मुस्लिम महिला समाधानी

राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून यासंबंधी निर्णय घ्यावा, केंद्र सरकारने सहा महिन्यांत संसदेत कायदा करावा: न्यायालय

तिहेरी तलाक धार्मिक प्रथा असून न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही: सरन्यायाधीश

तिहेरी तलाक घटनाबाह्य; खंडपीठातील न्यायाधीश नरिमन, ललित आणि कुरियन यांचे मत

सहा महिन्यांत संसदेत कायदा करावा. राजकारण बाजूला ठेवून राजकीय पक्षांनी निर्णय घ्यावा: सरन्यायाधीश

 

संसदेत कायदा करा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश

कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर ६ महिन्यांची बंदी: सर्वोच्च न्यायालय

तिहेरी तलाकसंबंधी कायदा करा: सरन्यायाधीश

तिहेरी तलाक कायम राहणार: सर्वोच्च न्यायालय

तिहेरी तलाकवर सुनावणी सुरू

सर्वोच्च न्यायालय थोड्याच वेळात निकाल देणार; कपिल सिब्बल न्यायालयात पोहोचले

ऐतिहासिक निकालाकडे सर्वांचे लक्ष

निकाल माझ्या बाजूने लागेल, असे मला वाटते- शायरा बानो

तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालय थोड्याच वेळात देणार निकाल