देशभरात मुले पळवणाऱ्या टोळीच्या अफवेतून मारहाणीच्या घटनांचे सत्र सुरुच आहे. त्रिपुरातील आगरतळा येथे मुले पळवणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याच्या संशयातून जमावाने फेरीवाल्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत त्या फेरीवाल्याचा मृत्यू झाला असून या मारहाणीत आणखी तीन जण जखमी झाले आहेत.

मूळचा उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरचा रहिवासी असलेला झाहीर खान (वय ३०) हा रोजगारासाठी त्रिपुरातील आगरतळा येथे गेला होता. गुरुवारी रात्री झाहीर, गुलझार खान, खुर्शिद खान (दोघेही बिहारचे रहिवासी) आणि स्वपन मिया हे चौघे जण कारमधून जात होते. गुलझार, खुर्शिद आणि स्वपन हे तिघे इलेक्ट्रिक सामान विक्रेते असून झाहीर हा फेरीवाला आहे.

आगरतळापासून २५ किलोमीटरवर असलेल्या सिधई मोहनपूर येथे चौघे पोहोचले असता स्थानिकांनी त्यांना बघितले. परिसरात लहान मुले पळवणाऱ्या टोळीची कार आल्याची अफवा गावात पसरली. यानंतर जमावाने त्यांना गाठले आणि चौघांनाही बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर केला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील झाहीरचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. तर अन्य तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.