पहिल्यांदाच सत्तेत आल्यावर राज्याचे विधीमंत्री या नात्याने दक्षिण दिल्लीतील खिर्की विस्तारित परिसरात ‘आप’च्या सोमनाथ भारती यांनी टाकलेल्या धाडी त्यांना चांगल्याच महागात पडण्याची चिन्हे आहेत. या धाडींच्या प्रकरणी भारती यांच्याविरोधात योग्य ती कारवाई तातडीने करण्यात यावी, अशी सूचना राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने दिल्ली पोलिसांना केली आहे.
या भागातील एक सामाजिक कार्यकर्त्यां शेहझाद पूूनावाला यांनी सोमनाथ भारती यांच्या आक्षेपार्ह वर्तनाबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे १७ जानेवारी रोजी तक्रार केली होती. त्या तक्रारीस अनुसरून संबंधित अधिकाऱ्यांनी दोषी व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई येत्या ८ आठवडय़ात करावी आणि त्याचा अहवाल आयोगाकडे सादर करावा, अशी सूचना देणारे पत्र आयोगाने दिल्ली पोलिसांना पाठवले.

न्यायदेवतेवर आपला विश्वास
मानवाधिकार आयोगाने आपले काम केले आहे. मात्र माझ्यावर त्याआधीच एक प्राथमिक माहिती अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात नवीन असे काही नाही. न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास असून मानवाधिकार आयोगाने या धाड प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मालवीय नगरात चौकशी अधिकारी पाठवावेत, अशी विनंती आपण करणार असल्याची प्रतिक्रिया सोमनाथ भारतींनी व्यक्त केली आहे.

सोमनाथ भारती प्रकरण
 १५ जानेवारी रोजी भारती यांच्या मालवीय नगर या मतदारसंघातील एका संकुलात अमली पदार्थाचा व्यवसाय आणि वेश्याव्यवसाय चालू असल्याचा आक्षेप घेण्यात आला. तत्कालीन विधीमंत्री असलेल्या भारती यांनी स्वत: पोलिसांकडे संबंधिक घरावर धाड घालण्याची विनंती केली. मात्र आपल्याकडे तसे आदेश नसल्याचे सांगत पोलिसांनी त्यास नकार दिला. तेव्हा भारती यांनी कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता नसताना एका घरावर छापा घातला आणि घरातील दोन महिलांना चाचण्यांसाठी लघवीचे नमुने देण्यास भाग पाडले.