अमेरिकेतील सत्ताधारी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसाधारकांना दिलासा दिला आहे. H-1B व्हिसावरील निर्बंध थोडे शिथिल केले आहेत. याआधी ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसाधारकांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा निर्णय लागू केला होता.

लॉकडाउन आधी जे काम करत होते, त्याच नोकरीसाठी H-1B व्हिसाधारकांना अमेरिकेत परतायचे असेल तर, त्यांना परवानगी देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. व्हिसावरील निर्बंध शिथिल करताना H-1B व्हिसाधारकाच्या पत्नीलाही अमेरिकेत परतण्याची परवानगी दिली आहे. H-1B व्हिसावरील निर्बंध शिथिल करण्याचा भारतीयांना सर्वाधिक फायदा होईल. H-1B हाच व्हिसा घेऊन भारतीय अमेरिकेत जातात तसेच याच व्हिसावर भारतीय मोठया संख्येन तिथे नोकरी करतात.

डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी नागरिकांना अमेरिकेत रोजगाराची संधी देणाऱ्या H-1B सह वेगवेगळया व्हिसांवर बंदी आणली होती. या व्हिसामुळे अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या संकटात येतात असा ट्रम्प यांचा दावा आहे. करोना व्हायरसमुळे अमेरिकेत लॉकडाउन होता. त्यामुळे तिथे मोठया प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. अशा काळात तिथल्या लोकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी वेगवेगळया व्हिसावर बंदी आणली होती. पण आता त्यांनी H-1B व्हिसाधारकांना दिलासा दिलाय.

एच १ बी व्हिसा म्हणजे..
हा अस्थलांतरित व्हिसा असून त्याच्या मदतीने परदेशी कर्मचऱ्यांना अमेरिकी कंपन्यांत काम करण्याची संधी मिळते. सैद्धांतिक व तंत्रज्ञान कुशलता असलेल्या कर्मचाऱ्यांनाच ही संधी मिळते. तंत्रज्ञान कंपन्या हजारो कर्मचाऱ्यांना परदेशातून घेत असते. त्यात भारत व चीन यांना जास्त संधी मिळते.