अमेरिकी अध्यक्षपदासाठी उमेदवारीकरिता स्थावर मालमत्ता सम्राट डोनाल्ड ट्रम्प व माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन हे रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक पक्षात आघाडीवर असल्याचे एका जनमत पाहणीत दिसून आले आहे.
अनेक वादग्रस्त विधाने करणारे ट्रम्प यांना ४६ टक्के मते पडली आहेत. सिनेटर ट्रेड क्रूझ यांना २६ टक्के मते मिळाली. ओहिओचे सिनेटर जॉन कॅसिच यांना २० टक्के मते मिळाली आहेत. सीएनएन ओआरजी यांच्या वतीने ही जनमत पाहणी करण्यात आली. सीएनएन ओआरसी सर्वेक्षणानुसार ट्रम्प हे उमेदवार ठरले, तर निवडणुकीत रंगत येईल कारण काही अपक्षांना ट्रम्प हे उमेदवार म्हणून असावेत असे वाटते. ट्रम्प यांनी उमेदवारीची लढत जिंकली तर ते चांगलेच असेल असे रिपब्लिकन पक्षाच्या ४७ टक्के प्रतिनिधींना वाटते. फेब्रुवारीत ट्रम्प यांना ४९ टक्के मते मिळाली होती. डेमोक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन आघाडीवर असून त्यांनी ५१ टक्के मते मिळवली असून बेर्नी सँडर्स यांना ४४ टक्के मते मिळाली आहेत. पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होत आहेत. दरम्यान ट्रम्प व क्लिंटन यांनी एकमेकांवर अमेरिकी अध्यक्षपदाला लायक नसल्याची टीका केली आहे. सीएनएनवर क्लिंटन यांनी ट्रम्प यांची विधाने बघता ते अध्यक्षपदास लायक नाहीत असे सांगितले. ट्रम्प यांनी सीएनएनला सांगितले की, हिलरी क्लिंटन यांच्यात अजिबात दम नाही, त्यांचे आयुष्य बघा त्या तीन-चार दिवसही धावपळ सहन करू शकत नाहीत, अध्यक्षपदासाठी लागणारी ताकद त्यांच्यात नाही. चीनला व्यापारात मागे टाकण्याचा अमेरिकेचा इरादा आहे. आयसिसला हरवायचे आहे, माझ्य मते हिलरी क्लिंटन यांच्याकडे अध्यक्षपदासाठी लागणारी ताकद नाही, व्हाइट वॉटर, इमेल प्रकरण अशी अनेक प्रकरणे त्यांच्यावर शेकली हे थांबले पाहिजे.