अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पराभव मान्य करीत नसल्याने अध्यक्षीय परंपरेलाच बाधा निर्माण झाली आहे. असे असले तरी सत्ता हस्तांतराच्या प्रक्रियेवर काही परिणाम होणार नाही, आपण जागतिक नेत्यांशी वेगवेगळ्या मुद्दय़ांवर बोलणीही सुरू केली आहेत, असे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी तीन नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांच्या विरोधात गेलेला कौल मान्य करण्यास नकार दिला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बायडेन यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती. निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत ट्रम्प यांनी न्यायालयांमध्ये दावे दाखल केले असून मतदानात व मतमोजणीत घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात कटू व सामाजिक दुभंग असलेली ही निवडणूक होती.

ट्रम्प यांनी पराभव स्वीकारण्यास नकार दिल्याबाबत विचारले असता बायडेन यांनी सांगितले, की त्यांनी पराभव स्वीकारलेला नाही ही अडचणीची बाब आहे पण तरी त्यातून मार्ग काढावा लागेल. अध्यक्षीय परंपरेला काळिमा फासणारे त्यांचे वर्तन आहे असेच म्हणावे लागेल.

ते म्हणाले की, ट्रम्प प्रशासनाने सत्तांतराची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात अडथळे निर्माण केले असून मात्र त्यामुळे आमच्या पुढील वाटचालीवर काही परिणाम होणार नाही. ज्यांनी ट्रम्प यांना मते दिली त्यांनी आता एकत्र येऊन या कटू राजकारणातून मार्ग काढावा. गेली पाच,सहा, सात वर्षे आम्ही हे कटू राजकारण अनुभवले आहे. जरी त्यांनी पराभव मान्य केला नाही तरी आम्ही आमचे काम सुरू केले आहे. करोना १९ सल्लागार मंडळ नेमले आहे. व्हाइट हाऊसमध्ये आमचे प्रशासन लवकरच स्थापित होईल. मंत्रिमंडळ ठरवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यांनी आम्ही जिंकलो हे मान्य केलेले नाही, पण आमच्या नियोजनात त्यामुळे फरक पडणार नाही. आता २० जानेवारीपासून आम्ही आमचे काम करणारच आहोत.

विजयाची घोषणा नाही

सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी, सामान्य सेवा प्रशासन विभागात नेमलेल्या प्रशासक एमिली मर्फी यांनी अजून बायडेन यांच्या विजयाची घोषणा केलेली नाही त्यामुळे काँग्रेसला ६३ लाख डॉलर्सचा निधी मिळालेला नाही. त्यामुळे सत्तांतराची प्रक्रिया रखडली आहे.

दुसऱ्या पर्वात सहज प्रवेश – पॉम्पिओ

अमेरिका आता ट्रम्प प्रशासनाच्या दुसऱ्या पर्वात सहजपणे प्रवेश करणार आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. या वक्तव्यातून त्यांनी ३ नोव्हेंबरच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याचे अमान्य केले आहे. पॉम्पिओ यांनी सांगितले, की ‘ट्रम्प प्रशासन दुसऱ्या पर्वात सहज प्रवेश करणार आहे. आम्ही त्यासाठी तयार आहोत. अमेरिकेत काय घडते आहे यावर जगाचे लक्ष आहे. आम्ही सर्व मते मोजणार आहोत. जो बायडेन अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्याचे प्रसारमाध्यमांनी जाहीर केलेले आहे त्याला ट्रम्प प्रशासनाने मान्यता दिलेली नाही.’ परंपरेप्रमाणे प्रसारमाध्यमेच विजय जाहीर करतात. त्यानुसार बायडेन हे सत्तांतर प्रक्रियेच्या तयारीत असतानाच पॉम्पिओ यांनी हे वक्तव्य केले आहे. परराष्ट्र खात्याच्या फॉगी बॉटम या मुख्यालयातून वार्ताहरांच्या प्रश्नाला उत्तरे देताना ते बोलत होते.