चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या भेटीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांमध्ये शिखऱ बैठक झाली. फिनलंडमधील हेलसिंकी येथे झालेल्या या भेटीनंतर अमेरिका-रशिया संबंध सुधारल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. तसंच २०१६ साली अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाचा कोणताही सहभाग नव्हता याचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला. भेटीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पुतीन यांनीही रशियाने कधीही अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला नाही हे स्पष्ट केलं.

रशियाच्या हॅकर्स आणि गुप्तहेर यंत्रणांनी २०१६ साली अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करून ट्रम्प यांना निवडून येण्यास मदत केली असे आरोप होत होते, त्यावर ट्रम्प यांनी स्पष्टीकरण दिलं. रशियाने कधीही अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला नाही. निवडणुकीत आम्ही शानदार प्रचार केला आणि त्यामुळेच मी राष्ट्रपती बनलो असं ट्रम्प म्हणाले. फिनलंडमधील हेलसिंकी येथे पुतीन यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प बोलत होते. पुतीन यांच्याशी भेट सकारात्मक झाली, थेट मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. यापूर्वी अमेरिका-रशिया यांच्यातील संबंध कधीच इतके वाईट बनले नव्हते, पण चार तासांच्या भेटीनंतर अखेर हे चित्र बदललं आहे. दोन्ही देशांमधील तणाव आता निवळला आहे, असं ट्रम्प म्हणाले.

दोन्ही नेत्यांची भेट होण्यापूर्वी मीडियासमोर डोनाल्ड ट्रम्प यांनी फुटबॉल वर्ल्डकपचं यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल पुतीन यांचं अभिनंदन केलं. रशियामधील हा वर्ल्डकप म्हणजे आतापर्यंतच्या वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ठ आयोजन असणारा ठरला, अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी रशियाचं कौतुक केलं.