अमेरिकेतील ह्यूस्टन येथे होणाऱ्या भारतीय वंशाच्या अमेरिकी लोकांच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार आहेत.  ‘हौदाय मोदी’ (हाऊ डू यू डू मोदी) मेळाव्यात रविवारी  भारतीय वंशाचे किमान पन्नास हजार लोक सहभागी होतील.

भारत व अमेरिका यांचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी हा मेळावा होत असून ट्रम्प यांच्या उपस्थितीची जी  घोषणा व्हाइट हाऊसने केली आहे. त्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले आहे. ट्रम्प यांची उपस्थिती म्हणजे दोन्ही देशातील विशेष मैत्री संबंधांचा गौरव आहे,असे मोदी यांनी म्हटले आहे.

दोन मोठय़ा लोकशाही देशांचे नेते एकत्र येऊन मेळाव्यात भाषण करण्याची जगाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले. भारतीय वंशाच्या पन्नास हजार लोकांनी २२ सप्टेंबरच्या या मेळाव्यासाठी नावनोंदणी केली असून ‘हौदाय मोदी  शेअर्ड ड्रीम, ब्राइट फ्युचर्स’या संकल्पनेवर कें द्रित असलेला हा मेळावा ह्यूस्टन येथील एनआरडी स्टेडियम येथे पार पडणार आहे.

रविवारी व्हाइट हाउसचे प्रसिद्धी सचिव स्टीफनी ग्रिशॅम यांनी सांगितले, की मोदी व ट्रम्प यांचा हा संयुक्त मेळावा असणार आहे.

विनंती मान्य

व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी जी ७ शिखर बैठक फ्रान्समध्ये झाली, त्या वेळी ट्रम्प यांना ह्य़ूस्टन येथील मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.

मोदींविरोधात वक्तव्ये टाळण्याचा सौदी अरेबिया, अमिरातीचा इम्रान खान यांना सल्ला

इस्लामाबाद : जम्मू काश्मीरमधील कलम ३७० काढून घेतल्याने सैरभैर झालेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मुस्लीम देशांनी गुप्त राजनैतिक वाटाघाटीतून मार्ग काढण्याचा सल्ला देतानाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रक्षोभक विधाने टाळण्यास सांगितले आहे. सौदी अरेबियाचे उपपरराष्ट्र मंत्री अब्देल अल जुबेर व संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला बिन अल नहया यांनी ३ सप्टेंबर रोजी एकत्रितपणे इस्लामाबादला भेट दिली. त्या वेळी त्यांनी त्यांच्या देशातील नेतृत्वाने दिलेला निरोप पाकिस्तानला दिला असून त्यात पाकिस्तानला सबुरीने वागण्याचा सल्ला दिला आहे. दी एक्स्प्रेस ट्रिब्यूनने याबाबतचे वृत्त दिले आहे.