पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर भारतीय लष्कर आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये पूर्वीसारखं विश्वासाचं वातावरण उरलेलं नाही, असं लेफ्टनंट जनरल अनिल चौहान म्हणाले. पुन्हा पूर्वीसारखं विश्वासाच वातावरण निर्माण होण्यासाठी काही काळ जावा लागेल, असं अनिल चौहान यांनी सांगितलं.

गलवानच्या घटनेनंतर अतिक्रमण किंवा समोरा-समोरील संघर्षाच्या मोठया घटना घडलेल्या नाहीत. नियंत्रण रेषेवर परस्पराबद्दल विश्वासाची जी भावना होती, ती आता राहिलेली नाही. त्यासाठी काही काळ जावा लागेल असे लेफ्टनंट जनरल अनिल चौहान म्हणाले. ते नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ठिकाणी बोलत होते.

भारत-पाकिस्तान १९७१ युद्धात भारताने आजच्याच दिवशी पाकवर विजय मिळवला होता. त्यानिमित्ताने राष्ट्रीय युद्ध स्मारकात पंतप्रधान मोदी आणि अन्य लष्करी अधिकाऱ्यांना शूर शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवून बांगलादेशची निर्मिती केली होती. या प्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘स्वर्णिम विजय वर्ष’ या चिन्हाचे अनावरण केले. आजपासून देशामध्ये भारत-पाकिस्तान युद्धाची ५० वर्ष साजरा करण्याच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. याला ‘स्वर्णिम विजय वर्ष’ म्हटले आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल.