काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि संघ परिवारावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढविला. देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांची नाराजी चिरडून टाकण्याचा सरकार आणि संघ परिवार प्रयत्न करीत असल्याचा आरोप गांधी यांनी केला. या दडपशाही आणि दुजाभावापासून विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यासाठी कायद्याची गरज असल्याचेही काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणाले.

महाविद्यालये आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दुजाभाव सहन करावा लागणार नाही आणि त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल जाणार नाही यासाठी कडक कायद्याची गरज आहे, असे राहुल गांधी म्हणाले. हैदराबादमधील विद्यार्थी रोहित वेमुला आणि जेएनयूमधील विद्यार्थ्यांचा नेता कन्हैयाकुमार यांना न्याय देण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिल्लीत मोर्चा काढला होता, त्याला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला.

संसदेत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केलेल्या अभिभाषणात रोहित वेमुलाचा मृत्यू आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, यांचा समावेश न केल्याबद्दल राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या विचारसरणीच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा आवाज केंद्र सरकार दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा प्रकारच्या दडपशाहीला पायबंद घालण्यासाठी कायदा करता यावा यासाठी काँग्रेस अखेरच्या क्षणापर्यंत लढा देईल, असेही ते म्हणाले.

राहुल यांचे विखारी राजकारण -भाजपचा आरोप

केंद्र सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपावर भाजपनेही जोरदार हल्ला चढविला आहे. राहुल गांधी नकारात्मक राजकारणाचा चेहरा असून मोदी सरकारविरुद्ध कारस्थान रचण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व पक्षांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे, असे भाजपने म्हटले आहे.