अब्दुल करीम टुंडाचा गौप्यस्फोट
गेल्या दोन दशकांपासून ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी अब्दुल करीम टुंडाला अटक झाल्यानंतर त्याच्याशी सुरू असलेल्या चौकशीत मोठे गौप्यस्फोट समोर आले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या(एनआयए) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टला भारतात स्फोट घडवून आणण्याचा आयएसआयचा बेत होता. अशी खळबळजनक माहिती टुंडाने दिली आहे.
त्याचबरोबर स्फोट घडविण्यासाठी पाठविलेला अतिरेकी अजूनही भारतातच असल्याचेही टुंडाने चौकशी दरम्याने म्हटले आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम अजूनही पाकिस्तानातच असल्याचेही टुंडाने सांगितले आहे. दाऊदला पाकिस्तानाबाहेर जाण्यासाठी पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा (आयएसआय) मदत करत असल्याचेही टुंडाने स्पष्ट केले आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक टुंडाची चौकशी करत आहेत. चौकशीतून समोर येणाऱया माहितीवरून पोलीस पुढील तपास सुरू करणार असल्याचेही समजते. अटक झाल्यानंतर टुंडाला दिल्लीतील न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे चौकशीत आणखी काही गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.