कुर्दिशांच्या सरकारविरोधी शांतता मोर्चात घातपात
सरकारविरोधात एकवटलेल्या डाव्या विचारांच्या व कुर्दिशसमर्थक कार्यकर्त्यांनी तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे शनिवारी काढलेल्या शांतता मोर्चात झालेल्या दोन शक्तिशाली स्फोटांत तब्बल ८६ नागरिक ठार तर १८६ जखमी झाले. जखमींपैकी २८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तुर्कस्तानच्या सार्वत्रिक निवडणुका वीस दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच आणि कुर्दिश बंडखोरांविरोधातील कारवाईचा धडाका सुरू असतानाच झालेल्या या भीषण स्फोटांनी राजकीय आसमंत ढवळून निघाला आहे. तुर्कस्तानच्या इतिहासातला हा सर्वात मोठा घातपाती हल्ला आहे.
हा हल्ला म्हणजे सरकारचे अपयश आहे, हा आरोप अंतर्गत सुरक्षामंत्री सेलामी अल्तनॉक यांनी फेटाळला. कुर्दिशवादी ‘पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी’ने मात्र हे सरकार पुरस्कृत हल्ले असल्याची जोरदार टीका केली आहे. जागतिक नेत्यांनी तुर्कस्तानच्या अध्यक्षांना शोकसंदेश पाठवू नयेत, असे संतापदग्ध आवाहनही या पक्षाने केले आहे.
देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांच्या संघटनेने आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी लोक अंकाराच्या रेल्वे स्थानकाजवळ गोळा झाल्यानंतर लगेच हे स्फोट झाले. कुर्दिश बंडखोर आणि तुर्की सुरक्षा दले यांच्यात नव्याने उफाळलेला हिंसाचार संपुष्टात यावा, असे आवाहन करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. स्फोटानंतर शेकडो कार्यकर्ते रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते आणि ‘रोजगार, शांतता आणि लोकशाही’ हे तीन हक्क नोंदवलेले प्रचारफलकही विखुरले होते. स्फोटानंतर एकच हलकल्लोळ माजला होता. पोलिसांनी सर्व परिसराची नाकाबंदी केली. लोकांचा आरडाओरडा, रुग्णवाहिकांचे व पोलीस वाहनांचे भोंगे यांनी परिसर दणाणला होता. या स्फोटाने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा सुरू केल्यानंतर जमावाला आटोक्यात आणण्यासाठई पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तयिप एर्दोगान यांनी या निर्घृण स्फोटांचा निषेध केला आहे. देशाच्या ऐक्य आणि शांततेवरचा हा घाला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. दहशतवादी गटांनी हे स्फोट घडविले का आणि हे आत्मघाती स्फोट होते का, याचा तपास सुरू आहे.

रक्तदानासाठी रांग! : स्फोटानंतर अंकारातील नागरिकांचे सामाजिक भानही जगासमोर आले. जखमींनी अंकारातील रुग्णालये भरू लागल्यानंतर शेकडो तरुणांनी रक्तदानासाठी रांग लावली होती.
बंडखोरांचा इन्कार : ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी’ (पीकेके) या बंडखोर संघटनेशी जवळीक असलेल्या संकेतस्थळाने या स्फोटांशी कोणताही संबंध असल्याचा इन्कार केला आहे. जोवर तुर्की सैनिक आमच्यावर हल्ला करीत नाहीत तोवर आम्ही हिंसक प्रत्युत्तर देत नाही. देशाच्या सार्वत्रिक निवडणुका शांततेत व्हाव्यात, हीच आमची इच्छा आहे, असे या गटाने स्पष्ट केले आहे.