राजस्थानात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील तीव्र मतभेदांमुळे राजस्थानातील काँग्रेस सरकार अडचणीत सापडले आहे. सचिन पायलट यांच्या नाराजीमुळे राजस्थानातही मध्य प्रदेशची पुनरावृत्ती घडू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांना मानणारे आमदारही पक्षातून बाहेर पडले आणि मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार कोसळले. आता राजस्थानही त्याचे दिशेने चालल्याचे दिसत आहे.

राजस्थानातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांनी दिल्लीत येऊन काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. सचिन पायलट यांनी अहमद पटेल यांना भेटून आपली नाराजी त्यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याबरोबर मतभेद विकोपाला गेल्याचे त्यांनी सांगितले. अहमद पटेल हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार समजले जातात.

सचिन पायलट यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे गेहलोत यांच्याबद्दलचा तक्रारीचा पाढाच वाचून दाखवला असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या एका सूत्रांने सांगितले. सचिन पायलट यांनी काँग्रेसचे दुसरे वरिष्ठ नेते के.सी.वेणूगोपाल यांची सुद्धा भेट घेतली. गेहलोत आणि पायलट यांच्यामध्ये फारसे सख्य नाही हे पक्षात सर्वांनाच माहित आहे. २०१८ साली जेव्हा काँग्रेसने राजस्थान विधानभा निवडणुकीत २०० पैकी १०७ जागा जिंकल्या, तेव्हा मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण झाला होता. सचिन पायलट मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम होते. त्यावेळी तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पायलट यांची समजूत काढून उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांना राजी केले होते.