उत्तर प्रदेशातील मूळ गावापासून ४५० कि.मी. अंतर पायी चालत २० तासांनी एक पोलीस शिपाई मध्य प्रदेशातील राजगड येथे कामावर हजर झाला. देशव्यापी टाळेबंदीमुळे कुठलीही वाहने उपलब्ध नसल्याने या २२ वर्षे वयाच्या या पोलीस शिपायाने कर्तव्य श्रेष्ठ मानले.

राजगड पोलीस विभागाने दिग्विजय शर्मा यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले असून त्याला काही दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे. अनेक तास पायी प्रवास करून त्याचे पाय सुजले आहेत. तो १६ ते २३ मार्च रजेवर होता कारण त्याला बी.ए.ची परीक्षा द्यायची होती. पण टाळेबंदीमुळे परीक्षा रद्द  झाली. त्यामुळे त्याने परत कामावर रुजू होण्याचे ठरवले.

पचोर पोलीस  स्टेशनच्या निरीक्षकांना त्याने कामावर परत येत असल्याची कल्पना दिली पण वाहन सेवा नसल्याने त्याने येऊ नये असा सल्ला त्यांनी दिला, त्याच्या कुटुंबीयांनीही त्याला घरीच राहण्याचा सल्ला दिला होता. तरी तो कामावर जाण्यासाठी पायी निघाला शनिवारी रात्री तो निघाला व वाटेत काही जणांनी त्याला थोडे अंतर लिफ्ट दिली.

इटवाह येथून तो २५ मार्चला निघाला. शनिवारी रात्री तो राजगडला पोहोचला. १ जून २०१८ रोजी तो मध्य प्रदेश पोलीस दलात कामाला लागला. राजगडचे पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले, की या पोलिसास प्रशंसा पत्र देण्यात आले आहे.