जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातील एका जवानासह दोघे शहीद झाले आहेत. सुमेध गवई असे शहीद जवानाचे नाव असून ते अकोल्यातील लोणाग्रा गावचे रहिवासी आहेत. गवई यांच्या वीर मरणाची बातमी समजताच लोणाग्रा गावात शोककळा पसरली आहे. शोपिया गावात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्याच्या वतीने शोध मोहीम राबवण्यात येत होती. त्याचवेळी दहशतवाद्यांनी अचानक जवानांवर हल्ला केला. भारतीय दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. पण दहशतवाद्यांनी अंदाधुंदपणे केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले. दरम्यान, चकमकीत तीन दहशतवादीही ठार झाला आहेत.

सुमेध गवई हे चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लोणाग्रा येथे त्यांचे आई-वडील, बहीण राहतात. त्यांचा लहान भाऊही लष्करात आहे. एक ऑगस्ट रोजीच त्यांचा वाढदिवस होता. लवकरच ते सुटीवर गावी येणार होते, असे सांगण्यात आले.