उत्तर प्रदेशातील नवीन धर्मातर विरोधी कायद्यानुसार अटक करण्यात आलेल्या दोघा भावांची शनिवारी न्यायालयाच्या आदेशानुसार मुक्तता करण्यात आली.

मुस्लीम व्यक्ती व त्याच्या भावाने ४ डिसेंबर रोजी त्यांनी हिंदू महिलेशी विवाहाकरिता मोरादाबाद विवाह नोंदणी कार्यालयास भेट दिली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती, त्याबरोबर हिंदू महिलेलाही ताब्यात घेऊन निवारागृहात ठेवले होते, असे कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले होते.

याबाबतच्या चित्रफितीत असे दिसून आले, की बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदर महिलेने धर्म बदलण्याबाबत जिल्हा दंडाधिकाऱ्यांना नोटिस दिली का? अशी विचारणा केली होती. कांथ पोलिस ठाण्याने याबाबत अहवाल सादर केला असून पिंकी हिने सक्तीच्या धर्मातराचे आरोप फेटाळल्याचे त्यात म्हटले आहे. रशीद व त्याचा भाऊ सलीम याने तिचे धर्मातर सक्तीने घडवून आणल्याचा आरोप होता.

त्यानंतर मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या अहवालानुसार दोघा मुस्लीम भावांची मुक्तता केली, अशी माहिती अभियोक्ता अधिकारी अमर तिवारी यांनी दिली. या दोघा भावांना मोरादाबाद येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते, तेथून त्यांची सुटका करण्यात आली.

गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीस न्यायालयाचा दिलासा

अलाहाबाद : उत्तर प्रदेशात नवीन ‘बेकायदेशीर धर्मांतर वटहुकूम २०२०’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींवर सक्तीने कुठलीही कारवाई करू नये, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. सदर व्यक्तीवर एका महिलेचे विवाहाच्या इराद्याने धर्मांतर केल्याचा आरोप आहे. नदीम याच्यावर मुझफ्फरनगर येथील मन्सूरपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने दाखल केलेल्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पंकज नक्वी व न्या. विवेक अगरवाल यांनी सुनावणी केली. न्यायालयाने सांगितले,की नदीम याच्यावर तक्रारदाराच्या पत्नीचे धर्मांतर केल्याबाबत कुठलेही ठोस पुरावे नसून त्याच्याविरोधात कारवाई करण्यात येऊ नये. तक्रारदाराची पत्नी सज्ञान असून तिला तिचे भले चांगले कळते. त्यामुळे ती व याचिकाकर्ता यांना व्यक्तिगततेचा हक्क असून ते दोघे प्रौढ आहेत. त्यांना सदर संबंधांच्या परिणामांची जाणीव आहे. त्यामुळे यात कारवाई करण्यात येऊ नये.