आग्रा शहरात शनिवारी सकाळी दोन ठिकाणी स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आग्रा कॅन्टोनमेंट रेल्वे स्थानकाजवळील एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आणि घराच्या टेरेस अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे स्फोट झाले आहेत. या स्फोटांचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी स्फोटांची तीव्रता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटात अद्यापपर्यंत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

काही दिवसांपूर्वी आयसिस या दहशतवादी संघटनेने आग्र्यातील ताजमहाल उडवून देण्याची धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर आग्र्यात सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तसेच पोलिसांकडूनही यमुना नदीच्या परिसरात गस्त वाढविण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार पहाटे पाचच्या सुमारास वाजता रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या प्लंबरच्या घरात पहिला स्फोट झाला. त्यानंतर सुमारे पाऊणतासाने स्थानकाच्या परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दुसरा स्फोट झाला. दरम्यान, आता या घटनेनंतर पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी याठिकाणी दाखल झाले आहेत.