अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवरील चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते छोटा शकीलच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती समोर आली आहे. छोटा शकीलने त्यांच्या हत्येसाठी सुपारी देखील दिली होती, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रातून उघड झाली आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन लेखक तारेक फतह यांची सुपारी घेतल्याप्रकरणी जुनैद चौधरी (२१) या शार्पशूटरला अटक केली होती. फतेह हे नियमितपणे भारतात येत असतात. त्यावेळी त्यांची हत्या करण्याचा शकीलचा कट होता. जुनैद हा छोटा शकीलसाठी काम करत होते. जुनैदसह शहबाझ आणि नसीम या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. जुनैदला छोटा शकीलने हवाला मार्फत दुबईवरुन दीड लाख रुपये पाठवले होते. या प्रकरणी पोलिसांनी नुकतेच पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात छोटा शकीलने आणखी तीन जणांची सुपारी दिल्याचा आरोप आहे. छोटा शकीलने विश्व हिंदू परिषदेचे माजी कार्यकर्ते रॉबीन शर्मा आणि दाऊदवर ‘कॉफी विथ डी’ हा चित्रपट तयार करणारे विशाल मिश्रा आणि विनोद रमानी या तिघांची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. पोलिसांनी मिश्रा आणि रमानी यांचा जबाबही घेतला असून त्या दोघांनीही चित्रपटानंतर फोनवरुन धमक्या येत असल्याचे सांगितले होते. छोटा शकील २००३ पासून रॉबिन शर्मा यांची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. छोटा शकीलने शर्मा यांच्या भावाची हत्या देखील केली होती. २००५ मध्ये ही हत्या झाली होती. गेल्या वर्षी मार्चमध्ये छोटा शकीलने जुनैदला ४५ हजार रुपये भजनपुरामधील शाखेत पाठवले. १६ मार्च रोजी ४० हजार रुपये पाठवले होते.