अहमदाबाद : भारत दौऱ्यावर येणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड-शो अहमदाबादमध्ये २४ फेब्रुवारी रोजी होणार असून त्यावेळी २२ कि.मी. मार्गावर दोन लाखांपेक्षा कमी लोक त्यांच्या स्वागतासाठी हजर असतील, असे गुरुवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. अमेरिकेच्या अध्यक्षांनी दावा केल्यापेक्षा स्वागतासाठी येणाऱ्या लोकांची संख्या कितीतरी कमी आहे.

अहमदाबादमधील स्टेडियम आणि विमानतळ यादरम्यान ७० लाख लोक स्वागतासाठी येतील असे मोदी यांनी म्हटल्याने आपण उत्साहित झालो आहोत, असे ट्रम्प यांनी अलीकडेच म्हटले होते. मात्र अहमदाबादमधील एकूण लोकसंख्याच जवळपास ७० लाख इतकी असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम अहमदाबादमधील मोतेरा क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार आहे. विमानतळ ते स्टेडियम या २२ कि.मी. मार्गावर एक ते दोन लाख लोक दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी हजर असतील, असे अधिकाऱ्यांना वाटत आहे.

मेलेनिया ट्रम्प दिल्लीतील शासकीय शाळेला भेट देणार?

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प या २५ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील शासकीय शाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे मेलेनिया ट्रम्प यांना शासकीय शाळेत नेऊन ‘आप’ सरकारने तयार केलेल्या आनंददायी अभ्यासक्रमाबाबत माहिती देण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.