समाजवादी पक्षातील वर्चस्वाची दंगल सुरूच आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना आव्हान देण्यासाठी मुलायम सिंह यादवदेखील आखाड्यात उतरले आहेत. मात्र आता मुलायम सिंह यादव यांच्याकडून देण्यात येणाऱ्या आदेशांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एक जानेवारीला मुलायम सिंह यादव यांनी दोन आदेश जारी केले होते. यातील पहिल्या आदेशानुसार मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आयोजित केलेले संमेलन बेकायदेशीर असल्याचे मुलायम सिंह यादव यांनी म्हटले होते. तर दुसऱ्या एका आदेशानुसार त्यांनी पक्षाचे उपाध्यक्ष किरणमय नंद यांची अधिवेशनात उपस्थित राहिल्याने हकालपट्टी करण्यात आली. मात्र या दोन्ही पत्रांवरील मुलायम सिंहांच्या सह्या वेगळ्या आहेत. त्यामुळे यातील मुलायम सिंहांची नेमकी स्वाक्षरी कोणती ?, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. यासोबतच मुलायम यांच्यासोबतच आणखी एखादी व्यक्ती पक्षाचे निर्णय घेते आहे का ?, असादेखील सवाल उपस्थित होतोआहे.

मुलायम सिंह निर्णय घेताना इतरांकडून हस्तक्षेप केला जात असल्याची शंका अखिलेश यादव यांनीदेखील व्यक्त केली होती. ‘काहीजण मुलायम यांना नियंत्रणात ठेवू पाहात आहेत. ते आपल्या मर्जीप्रमाणे कोणत्याही कागदपत्रांवर मुलायम यांच्या सह्या घेत आहेत,’ असे अखिलेश यादव यांनी म्हटले होते. मुलायम सिंह यादव यांची प्रकृती ठिक नसताना अखिलेश यांनी हे विधान केले होते.

अखिलेश यांनी काही दिवसांपूर्वी बाहेरच्या लोकांकडून पक्षामध्ये करण्यात येणाऱ्या हस्तक्षेपावर भाष्य केले होते. ‘निवडणुकाला अवघे तीन महिने शिल्लक आहेत. त्यांच्याकडून (मुलायम यांच्याकडून)’ कोणती व्यक्ती कोणत्या कागदपत्रांवर स्वाक्षरी घेईल, काहीही सांगता येणार नाही. पक्षाच्या हितासाठी मला यामध्ये लक्ष घालणे आवश्यक वाटते. समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यास सर्वाधिक आनंद मुलायम सिंहांशिवाय कोणालाच होणार नाही. ते फक्त माझ्या नेते नाहीत, तर वडिलदेखील आहेत. मी त्यांचा आदर करतो. आमच्या पिता-पुत्राच्या नात्याला कोणीही धक्का लावू शकत नाही,’ असे अखिलेश यादव यांनी म्हटले होते.

सह्यांबद्दल दोन्ही गटांना काय वाटते ?
मुलायम सिंह समर्थक नेते सी. पी. राय यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, ‘अनेकदा भावनेच्या भरात माणसाच्या स्वाक्षरी थोडी वेगळी होते. मात्र या दोन्ही सह्या मुलायम सिंहांच्या लेटरहेडवर असल्याने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ नये,’ असे म्हटले आहे. तर अखिलेश यादव यांचे समर्थक असलेल्या किरणमय नंद यांनी मुलायम यांच्या जागी कोणी दुसरीच व्यक्ती पक्षाचे निर्णय घेत असल्याचे म्हटले होते.