पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली असून, रविवारी पोलिसांना येथील एका घरात वृध्द महिलेचा सापळा आढळून आला. अरुण साहा (६५) आणि अजित साहा (५५) या भावांनी आपल्या वृध्द आईचे शव नऊ महिने घरात ठेवले होते, अशी माहिती पोलिसांकडून मिळते. हे दोघे भाऊ अविवाहीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांची ८५ वर्षीय आई नानी बाला साहाचा १६ जानेवारी रोजी मृत्यू झाला. त्यावेळी खूप थंडी असल्याने आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्याची माहिती साहा बंधुंनी पोलिसांना दिली. काही दिवसांनंतर आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू असे आम्हला वाटले. परंतु, नंतर तिच्या मृतदेहात किडे होऊ लागल्याने आम्ही तो अंत्यसंस्कारासाठी नेऊ शकलो नाही, अशी माहिती अरुण साहाने पोलिसांना दिली.

हे दोघे भाऊ शेजाऱ्यांशी जास्त संपर्क ठेवत नसतं. त्यांच्या आईच्या प्रकृतीविषयी विचारणा केली असता ती आजारी असून झोपली असल्याचे ते सांगत. कोणालाही ते आपल्या घरात येऊ देत नसत. काही दिवसांपूर्वी स्थानिक नगरपालिकेचे कर्मचारी रुपक अधिकारी पाहणी करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. रुपक अधिकारींना साहा बंधुंच्या घराचे माप घेण्याबरोबरच काही कागदपत्रांची पाहाणी करायची होती. परंतु साहा बंधुंनी त्यांना घरात येऊ दिले नाही. दोन्ही भावांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांनी शेजाऱ्यांना हाताशी घेऊन एक योजना आखली.

आम्ही सहा लोकांचा एक गट तयार केला आणि सकाळी त्यांच्या घरी गोलो. जेव्हा त्यांनी घरात येऊ दिले नाही, तेव्हा लोक जबरदस्ती त्यांच्या घरात घुसली. तेथे पलंगावर आम्हाला त्यांच्या आईचा सांगाडा पाहायला मिळाला. खोलीत खूप घाण होती आणि काळोख होता, अशी माहिती अधिकारी यांनी दिली. हाडांचा सांगाडा पाहून लोकांनी लगेचच पोलिसांना पाचारण केले. साहा बंधुंचे घर हमरस्त्यापासून आत असल्याने आजूबाजूच्या लोकांना मृतदेहाचा वास आला नाही. दोन्ही भाऊ बेरोजगार असून अरुण साहा काही वर्षांपूर्वी शिकवण्या घ्यायचे. दोघांचे मानसिक संतुलन ठिक नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.