कोलकाता : बँकॉकहून येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या दोन प्रवाशांना करोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. यामुळे कोलकातामध्ये करोना विषाणूची लागण झालेल्या प्रवाशांची संख्या आता तीन झाली आहे.

हिमाद्री बर्मन या प्रवाशाला करोनाची लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले तर नागेंद्र सिंह या प्रवाशाला करोनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले, असे विमानतळ संचालक कौशिक भट्टाचारजी यांनी सांगितले. या दोघांना बेलियाघाट आयडी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यापूर्वी अनिता ओराओन या प्रवाशाला करोनाची लागण झाल्याचे थर्मल चाचणीतून निष्पन्न झाले, असे भट्टाचारजी म्हणाले. कोलकाता-चीन यादरम्यान थेट उड्डाणे असलेल्या दोन विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे यापूर्वीच रद्द केली आहेत. तर इंडिगोने कोलकाता-ग्वांगझोऊ यादरम्यानची विमानसेवा ६ फेब्रुवारी रोजी तात्पुरती स्थगित केली आहे.

बँकॉक-दिल्ली विमानातील प्रवाशाला करोनाची लागण?

नवी दिल्ली : करोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून बँकॉक-दिल्ली विमानातील एका प्रवाशाला गुरुवारी स्वतंत्र कक्षात हलविण्यात आल्याचे स्पाइसजेटने म्हटले आहे. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर या प्रवाशाला विमानतळ आरोग्य संघटनेने स्वतंत्र कक्षात ठेवले आहे. बँकॉक-दिल्ली एसजी-८८ या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला करोनाची लागण झाल्याची शक्यता गुरुवारी स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने वर्तवली.

केरळमधील करोनाबाधित तिघांपैकी दोघांची प्रकृती स्थिर

नवी दिल्ली : केरळमधील ज्या तीन वैद्यकीय विद्यार्थ्यांना करोना विषाणूची लागण झाली होती, त्यापैकी एकाची प्रकृती सुधारल्यामुले त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे; तर इतर दोघांची प्रकृती आता स्थिर असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी सांगितले. इतर दोघांना सुटी देण्यापूर्वी त्यांच्या चाचण्यांच्या निश्चित परिणामांची आम्ही वाट पाहात आहोत. त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारत आहे आणि त्यांना लवकरच सुटी दिली जाईल, असे वर्धन म्हणाले.

पंतप्रधानांच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय मंत्रिगटाने ‘कोविड-१९’ असे नामकरण झालेल्या या विषाणूचा प्रतिबंध व त्यावरील उपाययोजना याबाबतची सद्य:स्थिती आणि कारवाई यांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच दुसरी बैठक घेतली. त्याबाबत आरोग्य मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. करोना विषाणूग्रस्त वुहान शहरातून हलवण्यात आलेल्या सर्व, म्हणजे ६४५ भारतीयांची विषाणूबाबतची चाचणी नकारात्मक आली असून, त्यांना सुटी देण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात आहेत, असेही हर्षवर्धन म्हणाले. देशातील २१ विमानतळांवर लोकांची करोना विषाणूसाठी तपासणी केली जात आहे. या रोगाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे आणि घ्यावयाचे प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सर्व राज्यांना माहिती देण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.