राज्यातील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सच्या युवा नेत्याच्या घरावर झालेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाल्याची घटना रविवारी पुलवामा येथे घडली. या वेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा पाठलाग करून दोघांना कंठस्नान घातले. लोकसभा निवडणुकीच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच अशा प्रकारचा हल्ला झाला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
पुलवामा भागात नॅशनल कॉन्फरन्सचे युवा नेते यावर मसुदी यांनी त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या वेळी दहशवाद्यांनी त्यांच्या घरावर हल्ला करून बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात सुरक्षा व्यवस्था पाहणारे अब्दुल हमीद आणि विनोद कुमार हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेले. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्यानंतर सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांचा पाठलाग केला. त्या वेळी उडालेल्या चकमकीत हल्लेखोर दोन्ही दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या वेळी दहशतवाद्यांनी पळवलेली पोलिसांची रायफलदेखील ताब्यात घेण्यात आली. या हल्ल्याची लष्कर-ए-तोयबाने घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम गेल्या महिन्यात जाहीर केल्यापासून आतापर्यंत प्रथमच अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.