जम्मू काश्मीरच्या हंडवारा जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. सैन्यदल आणि पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत ही कारवाई करण्यात आली आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी हे दोन अतिरेकी संलग्न आहेत, अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे. या दहशतवाद्यांनी नावे अद्याप सैन्यदलाने जाहीर केलेली नाहीत. आज पोलीस आणि सैन्यदलातर्फे ही मोहिम राबवण्यात आली. त्यानंतर या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांचा जो कट होता तो सैन्यदलाने उधळून लावला आहे. हा कट नेमका काय होता? यासंदर्भात या दोघांचीही चौकशी सुरू आहे. उत्तर काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी हे दोघेजण इथे दाखल झाले होते. अशी माहिती समोर येते आहे.
हिज्बुलच्या आत्मसमर्पण केलेला दहशतवादी दानिश अहमद याने कालच मुलींना आकर्षित करण्यासाठी तरूण दहशतवादाकडे वळतात अशी कबुली दिली होती. तसेच उत्तर काश्मीरमध्ये कसा दहशतवाद पसरवता येईल? याची जबाबदारी आपल्याला दिली होती असेही म्हटले होते. त्यानुसार आता हिजबुल मुजाहिद्दीन ही संघटना उत्तर काश्मीरमध्येही दहशतवाद पसरवण्यासाठी सक्रिय झाल्याचे दिसते आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2017 1:22 pm