गाझा सिटी : इस्राएल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष अधिकाधिक चिघळत चालला असून मंगळवारी गाझा पट्टय़ातून करण्यात आलेल्या हल्ल्यात इस्राएलच्या दक्षिण भागातील एका प्रकल्पामध्ये काम करणारे थायलंडमधील दोन कामगार ठार झाले.

त्यापूर्वी इस्राएलने केलेल्या हवाई हल्ल्यात पुस्तकांचे दुकान आणि शैक्षणिक केंद्र असलेली पॅलेस्टाइनमधील एक सहा मजली इमारत जमीनदोस्त झाली, असे पोलिसांनी सांगितले.

इस्राएल आणि गाझाच्या हमास यांच्यातील संघर्ष कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत, गेल्या आठवडय़ात हा संघर्ष सुरू झाला असून इस्राएलच्या लष्कराने आतापर्यंत शेकडो हवाई हल्ले केल्याचे वृत्त आहे. हमासचे दहशतवादी तळ हे इस्राएलचे लक्ष्य आहे. तर पॅलेस्टाइनच्या दहशतवाद्यांनी गाझाच्या नागरी क्षेत्रातून इस्राएलमधील नागरी क्षेत्रात ३४००हून अधिक रॉकेट हल्ले केले आहेत.

गाझातून मंगळवारी करण्यात आलेल्या हल्ल्यात एका प्रकल्पामध्ये काम करणारे थायलंडमधील दोन कामगार ठार झाले, तर अन्य सात जण जखमी झाले आहेत. इस्राएलकडून सातत्याने गाझावर हवाई हल्ले केले जात आहेत. त्यामध्ये एक सहा मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे. दगडमातीच्या ढिगाऱ्यात पुस्तके, कार्यालयातील खुर्च्या, संगणक विखुरल्याचे दिसत आहे.

गाझामधील हमास दहशतवाद्यांनी दीर्घ पल्ल्याची रॉकेट्स जेरुसलेमवर डागल्यानंतर १० मे रोजी तुफान संघर्ष सुरू झाला. त्यानंतर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये पॅलेस्टाइनमधील २१३ जण ठार झाले त्यामध्ये ६१ मुले, ३६ महिलांचा समावेश आहे तर १४४०हून अधिक जण जखमी झाले आहेत.