अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ व संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर यांचे ‘दोन अधिक दोन’ संवादासाठी दिल्लीत आगमन झाले. दोन अधिक दोन संवादाची ही तिसरी वेळ असून इंडो-पॅसिफिक भागात सहकार्य तसेच संरक्षण व सुरक्षा या दोन क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधात सुधारणा हे या संवादाचे दोन मुख्य उद्देश असणार आहेत. मंगळवारी पॉम्पिओ व एस्पर हे त्यांचे समपदस्थ परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करणार आहेत.

प्रादेशिक आणि जागतिक मुद्दय़ांवर सहकार्य हा त्यांच्या भेटीचा एक हेतू आहे. चीन बरोबर पूर्व लडाखमध्ये संघर्ष सुरू होत असताना अमेरिकेच्या दोन मंत्र्यांची ही भारत भेट महत्त्वाची ठरणार आहे. जयशंकर व राजनाथ सिंह यांच्याशी अमेरिकेचे दोन्ही मंत्री स्वतंत्रपणे द्विपक्षीय चर्चा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही भेट घेणार आहेत.

गेल्या आठवडय़ात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले होते की, द्विपक्षीय प्रश्नांवर दोन्ही देशात सांगोपांग चर्चा होणार असून प्रादेशिक व जागतिक मुद्दय़ांचाही समावेश असणार आहे. ‘बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अ‍ॅग्रीमेंट’ म्हणजे ‘बीइसीए’ला मान्यता देण्यासाठीही प्रयत्न होणार असून त्यामुळे दोन्ही देशातील संरक्षण संबंध वाढणार आहेत. ‘बीइसीए’मुळे उच्च लष्करी तंत्रज्ञान, काही भौगोलिक नकाशे व रसद यांच्या आदानप्रदानाची प्रक्रिया सोपी होणार आहे. २०१६ मध्ये अमेरिकेने भारताला महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून दर्जा दिला आहे. त्यावर्षी ‘एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अ‍ॅग्रीमेंट’ (एलइएमओए) करार दोन्ही देशात झाला होता.

२०१८ मध्ये ‘कम्युनिकेशन्स कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अ‍ॅग्रीमेंट’ (सीओएमसीएएसए) करार दोन्ही देशात झाला होता. २०२० मध्ये भारताला २० अब्ज डॉलर्सचे संरक्षण साहित्य विक्री करण्याचा अमेरिकेचा उद्देश आहे. दोन अधिक दोन संवाद प्रथम सप्टेंबर २०१८ मध्ये दिल्लीत झाला होता.

राजनाथ-एस्पर यांच्यात द्विपक्षीय चर्चा

अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क टी.एस्पर व त्यांचे समपदस्थ राजनाथ सिंह यांच्यात संरक्षण, सामरिक मुद्दय़ांवर सोमवारी द्विपक्षीय चर्चा झाली. एस्पर व राजनाथ सिंह यांच्यात लष्करी पातळीवर सहकार्य, संरक्षण व सामरिक मुद्दय़ांवर चर्चा झाली. संरक्षण मंत्री एस्पर यांना तीनही सेनादलांनी रायसिना हिल्सच्या साउथ ब्लॉकबाहेर सलामी दिली. त्यानंतर द्विपक्षीय चर्चेला सुरुवात झाली.