आगामी निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष सत्तेत आल्यास अमेरिका मोदींचे स्वागतच करेल असे अमेरिकन अधिका-यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात २००२ सालच्या गुजरात दंगलींमुळे अमेरिकेत येण्यापासून मोदींवर घातलेली प्रवेशबंदी अमेरिकेकडून लवकरच उठविण्यात येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री निशा बिस्वाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आगामी काळात मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यास त्यांच्याशी व्यवहार करताना अमेरिकेला कोणताही आक्षेप नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही असलेल्या भारतासारख्या देशात जनतेने निवडून दिलेल्या नेत्याबरोबर व्यवहार करण्यास अमेरिका नेहमीच तत्पर असेल, असेसुद्धा त्यांनी सांगितले.