ब्रिटिश मुस्लिमांनी सीरिया व इराकमध्ये जिहादी लढाई लढण्यासाठी जाऊ नये, असा फतवा इंग्लंडमधील आघाडीच्या इमामांनी जारी केला आहे. त्यात असे म्हटले आहे की,  त्या दोन्ही देशात मोठय़ा प्रमाणावर अत्याचार होत असून ते ‘इसिस’ ही अतिरेकी संघटना करत आहे, इस्लामला हे मान्य नाही.
इमामांनी म्हटले आहे की, इसिसच्या विषारी प्रचाराला ब्रिटिश मुस्लिमांनी बळी पडू नये. मॅंचेस्टर, लीड्स, बर्मिगहॅम, लिसेस्टर व लंडन येथील इमामांनी काढलेल्या फतव्यात म्हटले आहे की, ब्रिटन व युरोपीय समुदायाच्या मुस्लिमांनी आपल्या देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडावे व सिरिया व इराकमध्ये जाऊ नये.ब्रिटिश मुस्लिम विद्वान धर्मगुरूंनी असा फतवा काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा फतवा पूर्व लंडनमधील मसजिद अल तावाहिद मशिदीचे माजी इमाम शेख उस्मा हासन यांनी लिहिला आहे. दहशतवादी कारवायांशी संबंधित नागरिकांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले असून पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी उद्या ब्रिटिश जिहादींना परत ब्रिटनमध्ये येता येऊ नये यासाठी नवीन कायद्याची घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या दोन महिन्यात इसिसने भरतीसाठी ऑनलाईन संदेश टाकले होते त्यामुळे ब्रिटनमधून काही जण इराक आणि सीरियात गेले असावेत.
 ब्रिटनमध्ये मूलतत्त्ववाद विरोधी कार्यक्रम राबवला असून त्यामुळे इराक व सीरियात जिहादसाठी लढायला गेलेल्या ब्रिटिश मुस्लिमांचे प्रमाण दुप्पट असण्याची शक्यता आहे.इसिसच्या आवाहनानंतर अनेक देशांतील शिया पंथीयांनी जिहादसाठी गेल्याच्या वृत्ताची दखल घेऊनच इंग्लंडमधील मुस्लिम धर्मगुरूंनी पाश्चिमात्य देशांतील मुस्लिमांनी युद्धग्रस्त देशांत न जाण्याचे आवाहन केले आहे.