हिंसाचाराच्या भीतीने बांगलादेशात परतलेल्या रोहिंग्या शरणार्थीना पुन्हा सन्मानाने म्यानमारमध्ये प्रवेश द्यावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुटेरस यांनी मनिला येथे शिखर बैठकीच्या वेळी आँग सान स्यू की यांना केले.

म्यानमारच्या नेत्या आँग सान स्यू की यांनी रोहिंग्यांच्या प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेमुळे जगभरातून त्यांच्यावर टीका तर झालीच, शिवाय रोहिंग्यांवरील अत्याचाराबाबत काहीच वक्तव्य न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.

मुस्लीम अल्पसंख्याक असलेल्या रोहिंग्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी मंगळवारी अमेरिकी परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनीही आँग सान स्यू की यांच्याशी चर्चा केली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरस यांनी स्यू की यांना सांगितले, की रोहिंग्यांना सुरक्षित, सन्मानजनक पद्धतीने म्यानमारमध्ये परत प्रवेश देण्यात यावा, दोन्ही समाजात काही वितुष्ट असेल तर ते तडजोडीने दूर करण्यात यावे. गेल्या अडीच महिन्यात म्यानमारच्या रखाइन प्रांतातील लष्करी कारवाईमुळे सहा लाख रोहिंग्या शरणार्थी बांगलादेशात पळाले आहेत. उत्तर रखाइन प्रांतात आता रोहिंग्याना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

रोहिंग्या बंडखोरांनी म्यानमारमधील रखाइन प्रांतात पोलिस स्टेशन्सवर हल्ले केल्याने तेथील लष्कराने त्यांच्यावर कारवाई केली होती.

रोहिंग्या मुस्लिमांचे खून, बलात्कार व सामूहिक जाळपोळ या घटनात म्यानमारचे सनिक व बौद्धसमाज सामील होता, याचे पुरावे असल्याचे पत्रकार व  संयुक्त राष्ट्र अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तेथील लष्कराने स्वत:च नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात स्वत:ला दोषमुक्त ठरवून टाकले आहे. नोबेल विजेत्या आँग सान स्यू की या लोकशाहीवादी कार्यकर्त्यां असताना त्यांनी रोहिंग्यांवरील अत्याचारावर काही बोलण्याचे टाळले यावर मानवी हक्क गटांनी सडकून टीका केली होती. अमेरिकेने सावध पवित्रा घेत स्यू की यांना दोष न देता तेथील लष्कराला जबाबादार ठरवले आहे. स्यू की व संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरस यांची मंगळवारी सकाळी भेट झाल्याचे समजते.

सध्याची म्यानमारमधील स्थिती ही अस्थिरता व मूलतत्त्ववादाला पोषक आहे, शिवाय रोहिंग्यांचे विस्थापन ही मोठी शोकांतिका आहे. रोहिंग्यांना म्यानमारने सन्मानजनक पद्धतीने पुन्हा देशात प्रवेश देणे आवश्यक आहे.’   – अँतोनियो गुटेरस संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस