भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा असा सल्ला संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँतोनियो गुतेरेस यांनी दिला आहे. मंगळवारी पहाटे एअर स्ट्राईक करून भारताने पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँतोनियो गुतेरेस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानवर कारवाई केली. पुलवामा येथे शहीद झालेल्या चाळीस जवानांचा बदला भारताने घेतला त्यानंतर वायुदलाचं कौतुक होतं आहे. देशभरात जल्लोष साजरा होतो आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा असं म्हटलं आहे.

दोन्ही देशांमधले वातावरण अधिक तणावपूर्ण होऊ नये म्हणून आम्ही अशी अपेक्षा करतो की हे दोन्ही देश संयम बाळगतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध तणावाचे आहेत. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर हा तणाव जास्त वाढला होता. आता भारताने कारवाई केल्यावर दोन्ही देशांनी सबुरीने घ्यावं असा सल्ला अँतोनियो गुतेरेस यांनी दिला आहे.

पुलवामात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. या घटनेचा तीव्र निषेध संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही नोंदवला. तसेच हा हल्ला निंदनीय आणि कायरतेचे लक्षण असल्याचेही म्हटले होते. आता संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँतोनियो गुतेरेस यांनी दोन्ही देशांना सबुरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.