संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न अभियानास (डब्ल्यूएफपी) शुक्रवारी २०२० चा शांततेचा नोबेल पुरस्कार  जाहीर करण्यात आला. जगातील भूक आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न हाताळण्यात या संस्थेने मोलाची भूमिका पार पाडली असून  १० कोटी पोटांची भूक भागविणाऱ्या या अभियानाचे योगदान सर्वात महत्त्वपूर्ण ठरल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.

नोबेल समितीचे प्रमुख बेरीट रिस अँडरसन यांनी म्हटले आहे,की या पुरस्काराने जगाचे लक्ष प्रथमच जगातील भुकेच्या समस्येकडे वेधले गेले. करोनामुळे ही समस्या अधिक बिकट झाली. अन्न सुरक्षा हे शांतता निर्माण करण्याचे एक साधन आहे हे विसरता कामा नये. विविध देशांमध्ये बंधुभाव निर्माण करण्यात प्रगती व्हावी असे या पुरस्काराचे निर्माते आल्फ्रेड नोबेल यांचे मत होते. त्यांची इच्छा पूर्ण करण्यात संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न अभियानाने मोठी भूमिका पार पाडली.

१ फेब्रुवारीच्या मुदतीपर्यंत यावर्षी शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी अनेक नामांकने आली होती. त्यात २११ व्यक्ती व १०७ संस्था होत्या. नॉर्वेच्या नोबेल समितीने निवडीबाबत गुप्तता बाळगली होती. ११ लाख डॉलरचा हा पुरस्कार असून त्यात सुवर्णपदकाचाही समावेश आहे. डब्ल्यूएफपीचे प्रमुख डेव्हिड बीसली यांनी सांगितले, की या पुरस्काराने एकाचवेळी धक्काही बसला व आश्चर्यही वाटले.

योगदान..  

८८ देशातील १० कोटी नागरिकांना गेल्या वर्षी या संस्थेने अन्नासाठी मदत केली. करोना विषाणूची साथ ही अनेक नागरिकांना वाईट अनुभव देत असताना काही देशांतील नागरिक उपासमारीने हतबल झाले होते. त्यांच्यापर्यंत बिकट वाटेतून अन्न पोहोचविण्याचे कार्य या संस्थेने केले. त्यांचे कार्य देशादेशांतील बंधुभाव वाढविण्यास उपयुक्त ठरल्याचे मत नोबेल समितीने नोंदविले.