ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य होत नसल्याने नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. या मुलीने स्वत:ला जाळून घेतले. केरळच्या मालाप्पूरम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहता येत नसल्याने ही मुलगी निराश झाली होती असे तिच्या कुटुंबियांनी सांगितले. पीटीआयच्या हवाल्याने एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

“घरात टीव्ही आहे. पण तो सुरु नाहीय. टीव्ही रिपेअर करण्याची गरज आहे, असे तिने मला सांगितले होते. पण मी टीव्ही रिपेअर नाही करु शकलो” असे मुलीच्या वडिलांनी सांगितले. मुलीचे वडिल दैनंदिन रोजंदारीवर काम करतात. लॉकडाउनमुळे सध्या अत्यंत अल्प उत्पन्नावर घर चालवावे लागत आहे.

“तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले ते समजत नाहीय. मैत्रिणीच्या घरी जाऊ शकतो असा पर्यायही मी तिला सुचवला होता” असे त्यांनी सांगितले.

“कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने आपण पुढे शिक्षण घेऊ शकणार नाही किंवा आपल्या शिक्षणावर परिणाम होईल याची चिंता मुलीला सतावत होती” असे अधिकाऱ्याने सांगितले. केरळचे शिक्षण मंत्री सी. रवींद्रनाथ यांनी या दुर्देवी घटनेबद्दल जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे.

करोना व्हायरसचा धोका असल्यामुळे केरळ सरकारने एक जूनपासून ‘फर्स्ट बेल’ म्हणून ऑनलाइन शिक्षणवर्ग सुरु केले आहेत. व्हिक्टर्स चॅनलवर हे ऑनलाइन शिक्षण वर्ग प्रक्षेपित होतात. राज्यातल्या अडीच लाख विद्यार्थ्यांकडे टीव्ही किंवा ऑनलाइ इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाहीय. सरकार प्रायोजकांच्या मदतीने छोटया-छोटया गटांना लॅपटॉप उपलब्ध करुन देण्याच्या योजनेवर काम करत आहे.