स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे एसपीजीच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वावरणाऱ्यांना स्वत: पंतप्रधान झाल्यासारखे वाटते असे भाजपा खासदार नीरज शेखर मंगळवारी राज्यसभेत म्हणाले. एसपीजी कायद्यात सुधारणा करण्यासंबंधीच्या विधेयकावरील चर्चेत ते सहभागी झाले होते. नीरज शेखर हे माजी पंतप्रधान चंद्र शेखर यांचे सुपूत्र असून ११ वर्ष त्यांना एसपीजीची सुरक्षा होती.

आतापर्यंत माजी पंतप्रधानांच्या कुटुंबियांना एसपीजीची सुरक्षा मिळत होती. एसपीजी सुरक्षेमध्ये पुढे-मागे बुलेट प्रूफ गाडयांचा ताफा असतो. विमानतळावर बंधनकारक असणाऱ्या तपासणीतून तसेच सुरक्षा चौक्यांवर तपासणीमधून विशेष सवलत मिळते. एसपीजीवरील चर्चेच्यावेळी नीरज शेखर यांनी आपला हा अनुभव राज्यसभेमध्ये सांगितला.

“जे लोक एसपीजीच्या सुरक्षेमध्ये असतात त्यांना या देशाचे पंतप्रधान झाल्यासारखे वाटते. आपण कोणीतरी विशेष आहोत अशी त्यांची भावना असते” असे नीरज शेखर म्हणाले. एसपीजी कायद्यात सुधारणा करण्याच्या विधेयकाला पाठिंबा देताना भाजपाला देशातून व्हिआयपी संस्कृती ह्ददपार करायची आहे असे त्यांनी निक्षून सांगितले.

आताच्या तरुणांना व्हीआयपी संस्कृती आवडत नाही. “१९९१ साली जेव्हा एसपीजी कायद्यात सुधारणा झाली तेव्हा मला सुद्धा सुरक्षा मिळाली. खरंतर त्याची गरज नव्हती. पण त्यावेळी मी तरुण होतो. २२ वर्षांचा असल्याने मला एसपीजी सुरक्षेची भुरळ पडली. मी जेव्हा विमानतळावर जायचो. तेव्हा माझी कार विमानापर्यंत जायची. मी कुठेही जाईन तेव्हा माझ्या गाडीबरोबर बुलेट प्रुफ गाडयांचा ताफा असायचा” असे नीरज शेखर यांनी सांगितले.

एसपीजी कायद्यात सुधारणा करण्याच्या विधेयकाला राज्यसभेने मंगळवारी मंजुरी दिली. एसपीजी हा पंतप्रधानांची सुरक्षा संभाळणारा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आहे. गांधी कुटुंबाजी एसपीजी सुरक्षा काढण्याच्या मुद्यावरुन सध्या आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. राजकीय सूडभावनेपोटी हा निर्णय घेत असल्याचा विरोधकांजा आरोप अमित शाह यांनी फेटाळून लावला.

फक्त गांधी कुटुंबाची नव्हे तर सरकारला १३० कोटी भारतीयांच्या सुरक्षेची काळजी आहे असे अमित शाह म्हणाले. एसपीजी सुधारणा विधेयकावरील चर्चेत उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, “सूड भावनेने भाजपाने कोणतीही कृती केलेली नाही. भूतकाळात काँग्रेसने अशा प्रकारचे निर्णय घेतले होते.” सूडाचं राजकारण करणं हा भाजपाच्या संस्कृतीचा भाग नाही असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मागच्या आठवडयात संसदेमध्ये म्हणाले होते.