तिमाहीत ६२ लाख बेरोजगार; चार दशकातील सर्वोच्च प्रमाण
बिकट अर्थव्यवस्थेच्या ‘युरो झोन’मधील चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या स्पेनमध्ये बेरोजगारीचा दर ७० च्या दशकानंतर सर्वोच्च टप्प्यावर पोहोचला आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत तब्बल ६० लाखांहून अधिक बेरोजगार झाले असून हाताला काम नसल्याचे हे प्रमाण २७.२० टक्क्यांवर गेले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून एकूणच ‘युरो झोन’मधील अर्थव्यवस्था सुधारण्याचे अद्यापही कोणतेच लक्षण दिसत नाही. युरो हे समान चलन असलेल्या विविध २७ देशांपैकी अनेक छोटय़ा-मोठय़ा देशांनी २०१० पासून सुरू झालेल्या मंदीच्या गर्तेतून सावरण्यासाठी आर्थिक उपाययोजनाही राबविल्या.
याच ‘युरो झोन’मध्ये स्पेनचाही समावेश आहे. किंबहुना या भागातील चौथा मोठा अर्थव्यवस्थेचा देश म्हणून स्पेन ओळखला जातो. मात्र यंदाच्या मंदीचा मोठा फटका बेरोजगारीचे जाहीर झालेल्या प्रमाणावरून दिसून येतो. जानेवारी ते मार्च २०१३ या तिमाहीत येथे ६२ लाखांचे काम कमी झाले आहे.
सलग सातव्या तिमाहीत बेरोजगारांची संख्या वाढली असून १९७० नंतरही सर्वात मोठय़ा बेरोजगारीचे प्रमाण यंदा नोंदले गेले आहे. यंदाच्या बेरोजगारीचा दर २७.२० टक्के असून तो गेल्या चार दशकातील सर्वाधिक आहे. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी शुक्रवारी पॅकेज जाहीर करण्याचे स्पेनचे पंतप्रधान मारिओ राजोय यांनी गेल्याच आठवडय़ात स्पष्ट केले होते.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने स्पेन हा देश बेरोजगारी पुढील वर्षी अधिक, २६.५ टक्के प्रमाण राखेल, अशी भीती व्यक्त केली आहे. स्पेनसह याच भागातील इटलीही वित्तीय तुटीचे अपेक्षित उद्दीष्ट राखण्यासाठी झटत आहे. दरम्यान, आर्थिक सुधारणा राबवित नसल्याबद्दल माद्रिदच्या संसदेला गुरुवारी संतप्त जमावालाही सामोरे जावे लागले.