महागाई हा गरीब आणि मध्यमवर्गावर लादण्यात आलेला छुपा कर आणि अन्याय्य कर असल्याचे नमूद करत अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी ‘आपल्या सरकारने महागाईचे कंबरडे मोडून काढून तिचा सरासरी दर ४.६ टक्क्य़ांवर आणणारी कामगिरी केली’, असे प्रतिपादन शुक्रवारी केले.

आधीच्या काँग्रेस आघाडीप्रणीत सरकारच्या कार्यकाळात म्हणजे वर्ष २००९ ते २०१४ दरम्यान महागाई दर १०.१ टक्क्य़ांवर होता, तो गेल्या पाच वर्षांत निम्म्याहून कमी म्हणजे सरासरी ४.६ टक्क्यांवर मर्यादित राखण्याची कामगिरी विद्यमान सरकारने केली, असे गोयल यांनी लोकसभेत अर्थसंकल्प मांडताना नमूद केले. महागाई दर नियंत्रित करण्यात अपेक्षित यश मिळाले नाही, अशी कबुली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही दिली होती, याचे त्यांनी स्मरण करून दिले.

त्या उलट यापूर्वीच्या कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात शक्य झाले नाही अशी महागाईचे कंबरडे पार मोडून काढणारी कामगिरी विद्यमान सरकारने करून दाखविली, असा दावा गोयल यांनी केला. डिसेंबर २०१८ अखेर तर महागाई दराने २.१९टक्क्य़ांचा नीचांक गाठल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

जर सरकारने महागाई दरावर नियंत्रण आणले नसते तर भारतातील कुटुंबांना आपल्या अन्न, प्रवास भाडे, प्रवास वगैरे नित्य गरजा भागविण्यासाटी ३५-४० टक्के अधिक खर्च करावा लागला असता. शिवाय ही कामगिरी अर्थव्यवस्थेत दमदार वाढ साधत करण्यात आली आहे, याकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष वेधले. २०१३-१४ साली जगातील ११ वी मोठी अर्थव्यवस्था ते आज जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था असा प्रगतीपर प्रवास करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.