बेरोजगारीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी निशाणा साधला आहे. रोजगार कशाला म्हणतात, याची राजकुमारांना माहितीच नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. देशातील १२ हजार कोटींचा रोजगार ७० टक्के युवकांच्या हातात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) गिरिराज सिंह यांनी बेरोजगारीवरुन मोदी सरकारवर होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले. ते पाटणा येथे टूल रुम आणि ट्रेनिंग सेंटर येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

ते म्हणाले, देशात एक ‘राजकुमार’ (राहुल गांधी) आहेत. रोजगार कशाला म्हणतात याची राजकुमारांना माहितीच नाही. देशात आज १२ हजार कोटींचा रोजगार ७० टक्के युवकांच्या हातात आहे. आज देशात १८ लाख नवउद्योगपती उभे राहिले असून ही आकडेवारी आरबीआयच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. एमएसएमईने मागील चार वर्षांत सुमारे २ कोटी लोकांना रोजगार दिल्याचा दावाही त्यांनी केला. राजकुमारांच्या काळात देशात केवळ १७ क्लस्टर सुरु होते. पण मोदींच्या कार्यकाळात ९४ क्लस्टर सुरु झाले आहेत.

३५० केशकर्तनकार ज्यांच्याकडे कौशल्याची कमतरता नव्हती. त्यांना जावेद हबीब यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.