बसपा प्रमुख मायावती यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार साधना सिंह यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निषेध केला आहे. आमचा पक्ष भाजपाबरोबर आहे. पण मायावतींविरोधातील अपमानजनक वक्तव्यांशी आम्ही सहमत नाही. त्या आमच्या दलित समाजाच्या एक कर्तृत्ववान महिला असून त्या चांगल्या प्रशासक असल्याचे त्यांनी म्हटले.

इतक्यावरच आठवले थांबले नाहीत. ते म्हणाले, जर आमच्या पक्षातील कोणी असे वक्तव्य केले असते. तर आम्ही निश्चितपणे कारवाई केली असती, असेही त्यांनी म्हटले.

चंदोलीमधील मुगलसराय मतदारसंघातील आमदार असलेल्या साधना सिंह परनपुरा गावातील किसान कुंभ अभियानात सहभागी झाल्या होत्या त्यावेळी त्यांनी मायावतींवर ही टीका केली. त्या म्हणाल्या, ”उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री स्त्री आणि पुरुष दोन्हीही नाहीत. जेव्हा द्रौपदीचे वस्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. मात्र सपाने मायावतींचे वस्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी सपासोबत आघाडी करून महिलांच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला आहे.”

दरम्यान, भाजपाच्या महिला आमदारांनी केलेल्या या टीकेविरोधात बसपाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाच्या नेत्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, असा टोला हसपा नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी लगावला आहे. भाजपा नेत्यांनी मायावतींविरोधात ज्या भाषेचा वापर केला आहे. तो त्यांची पातळी दाखवतो. सपा-बसपा आघाडी झाल्यानंतर भाजपा नेत्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, असे मिश्रा म्हणाले.