मेंदूच्या दोन वेगवेगळ्या भागात सहकार्य घडून एखादी संयुक्त कृती कशी घडते याचे कोडे भारतीय वैज्ञानिकाच्या नेतृत्वाखालील संशोधक चमूने उलगडले आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठातील विद्युत अभियांत्रिकीचे प्राध्यापक कृष्णा शेणॉय यांनी मेंदूतील अंतर्गत भागात समन्वय कशा प्रकारे चालतो हे कोडे उलगडले आहे. मेंदूत अब्जावधी न्यूरॉन्स हे वेगवेगळ्या भागात असतात. मेंदूच्या प्रत्येक भागाला विशिष्ट कार्य वाटून दिलेले आहे.
मेंदूला माहिती अनेक भागात प्राप्त होत असते पण ती आवश्यक तेव्हाच कशी वापरली जाते यावरचे हे संशोधन शेणॉय यांच्या प्रयोगशाळेत झाले असून मॅथ्यू टी. कॉफमन यांनीही त्यात सहभाग घेतला आहे. आपल्या बाहूंच्या हालचालींसह इतर व्यापक स्वरूपाच्या हालचालींवर त्यात प्रयोग करण्यात आले. त्यांनी हे तंत्र बाहूंच्या हालचालींवर वापरले असता त्यांना मेंदूचे विविध भाग अगोदर वेगवेगळ्या भागात संदेश ग्रहण करतात व नंतर ते आवश्यकतेनुसार इतर भागांकडे पाठवतात. कॉफमन यांनी सांगितले, की आपल्या मेंदूतील न्यूरॉन्स सतत सतर्क असतात व मेंदूच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे नेमके काय संदेश जातात हे पाहणे महत्त्वाचे असते. वैज्ञानिकांनी माकडांना बाहूंची हालचाल करण्याचे विशिष्ट प्रशिक्षण दिले व त्यांना हालचाल करण्यापूर्वी विसावा घेण्यास शिकवण्यात आले. त्यांना हालचाल करण्यापूर्वी मेंदूची पूर्वतयारी करण्यास शिकवले गेले. त्यांच्या स्नायूंची मापने पूर्वतयारी व प्रत्यक्ष कृतीच्या वेळी करण्यात आली. मेंदूत अतिशय गुंतागुंतीच्या नोंदी घेतल्या जात असतात. बाहूच्या हालचाली मेंदूचे दोन भाग नियंत्रित करीत असतात, ते मेंदूचा वरचा भाग जो काही इंच बाजूला असतो त्याचा समावेश असतो. यातील प्रत्येक भाग हा २ कोटी नूरॉन्सचा बनलेला असतो. वैज्ञानिक या दोन्ही भागांचे वर्तन जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत पण ते लाखो न्यूरॉन्स नेमके कसे काम करतात, हे पाहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी दोन भागातील प्रत्येकी १०० ते २०० न्यूरॉन्सचे नमुने घेतले व त्यांच्या मदतीने निष्कर्ष काढले. हे संशोधन ‘नेचर न्यूरोसायन्स’ या नियतकालिकाने प्रसिद्ध केले आहे.