नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्य़ात २०१७ मध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपने हकालपट्टी केलेला आमदार कुलदीपसिंह  सेनगर याला दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेप आणि २५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा ऐकल्यानंतर सेनगर हुंदके देत रडला.

सेनगरला २५ लाख रुपयांचा दंड महिनाभरात भरावा लागेल. सेनगर २५ लाखांचा दंड भरण्यास असमर्थ ठरल्यास त्याची संपत्ती जप्त करून दंड वसूल केला जाईल. सेनगरने पीडीत तरुणीच्या आईला १० लाख रुपयांची अतिरिक्त भरपाई द्यावी. पीडीत तरुणी  आणि तिचे कुटुंब वर्षभर दिल्ली महिला आयोगाने दिलेल्या भाडय़ाच्या घरात राहिल. घराचे दरमहा १५ हजार रुपये भाडे उत्तर प्रदेश सरकारने भरावे. तसेच पीडीतेच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची व्यवस्था केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करेल आणि दर तीन महिन्यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी हा निकाल दिला.

न्यायालयाने सोमवारी भादंवि तसेच ‘पॉक्सो’ कायद्यान्वये सेनगरला याला दोषी ठरवले होते. २०१७ मध्ये सेनगरने युवतीवर अत्याचार केला तेव्हा ती अल्पवयीन होती. ‘पॉक्सो’ कायद्यानुसार आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद यावर्षी ऑगस्टमध्ये करण्यात आली आहे. पण हा गुन्हा आरोपीने २०१७ मध्ये केल्याने सेनगरला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली नाही. या प्रकरणात शशी सिंह ही सहआरोपी होती. तिला मात्र न्यायालयाने सर्व आरोपांतून मुक्त केले. कारण ती सहआरोपी असल्याचे सिद्ध करणारे पुरावे सादर करण्यात सीबीआयला अपयश आले. शशी सिंह हिलाही अशाच परिस्थितीला तोंड द्यावे लागले असण्याची शक्यता न्यायालयाने व्यक्त केली.

पीडित तरुणी अत्याचार झाला तेव्हा अल्पवयीन होती, हे सिद्ध करणारे पुरावे सीबीआयने सादर केले आणि त्यानुसारच खटला दाखल केला होता. सेनगर याच्या त्या काळातील हालचाली त्याच्या तीन मोबाईल सिमकार्डवरील माहितीशी सुसंगत नाहीत. त्याच्याकडे दोन मोबाईल होते. पीडितेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून सेनगरच्या कृत्यांची माहिती दिल्यानंतर तिच्या कुटुंबीयांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यात सेनगर याचा दबाव कारणीभूत होता, अशी टिप्पणी सेनगर याला पॉक्सोनुसार दोषी ठरवताना न्यायालयाने नमूद केले.

सीबीआयने आरोपपत्र उशिरा दाखल केल्याबाबत न्यायालयाने ताशेरे ओढले. आपण ग्रामीण भागातील असल्याने बलात्काराबाबतची तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याचे पीडितेचे स्पष्टीकरण न्यायालयाने मान्य केले.

या प्रकरणातील पीडिता तिच्या काकांना भेटण्यास जात असताना तिच्या गाडीला अपघात घडवण्यात आला. त्यात तिच्या दोन नातेवाईक महिला ठार झाल्या. तिचे वकील आणि ती गंभीर जखमी झाले.  न्यायालयाच्या आदेशानुसार तिला उपचारासाठी दिल्लीला नेण्यात आले. या प्रकरणाशी संबंधित आणखी तीन खटले दाखल आहेत. त्यात पीडितेच्या वडिलांना खोटय़ा शस्त्रास्त्र गुन्ह्य़ात गुंतवणे, त्यांचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू, सेनगर याने घडवून आणलेला कथित अपघात या खटल्यांचा समावेश आहे.

विश्वासघातकी लोकसेवक!

सेनगर हा आमदार या नात्याने लोकसेवक असून त्याने लोकांचा विश्वासघात केला आहे, त्याच्याविरोधातील आरोप सिद्ध झाले आहेत, त्याने पीडीत तरुणीला सतत धमकावण्याचा प्रयत्न केला होता, असे न्यायाधीशांनी नमूद केले.