उन्नावमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या पत्नीने आत्महत्येचा इशारा दिला आहे. ‘माझे पती निर्दोष असून ते दोषी ठरले तर संपूर्ण कुटुंबच आत्महत्या करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणातील पुरावे लपवले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

उन्नावमधील भाजपा आमदार कुलदीप सिंह आणि त्यांच्या भावांनी अठरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीच्या वडिलांचा उन्नावमधील पोलीस कोठडीत मृत्यू झाला आणि या प्रकरणात उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारवर टीकेची झोड उठली. आमदाराच्या सांगण्यावरुन वडिलांना ठार करण्यात आले, असा आरोप पीडितेने केला. ५ एप्रिल रोजी मुलीच्या वडिलांना शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. पीडितेच्या वडिलांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांना आमदाराचा भाऊ अनिल सिंहने मारहाण केली होती, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

उन्नावमधील सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे योगी सरकार अडचणीत आले असतानाच आता कुलदीप सिंह यांची पत्नी संगीता सेंगर यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. ‘माझे पती निर्दोष आहेत, ते जर दोषी ठरले तर संपूर्ण कुटुंबच आत्महत्या करेल. या प्रकरणातील पुरावे लपवले जात आहे. हे चुकीचे असून आम्हाला न्याय हवा, असे संगीता सेंगर यांनी सांगितले.

दरम्यान, उन्नावमधील बलात्कार प्रकरणासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. बुधवारी लखनौमधील अतिरिक्त पोलीस महासंचालक राजीव कृष्णा यांनी उन्नावमध्ये पीडितेची निवास्थथानी जाऊन भेट घेतली. आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी इथे आलो आहोत. संध्याकाळपर्यंत आम्ही सरकारला प्राथमिक अहवाल सादर करु. या प्रकरणातील प्रत्येक पैलू तपासून बघितला जाईल. विशेष तपास पथकावर कोणताही दबाव नाही, असे राजीव कृष्णा यांनी माध्यमांना सांगितले. पीडितेच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे. आता त्यांना उन्नावमध्ये राहायचे आहे की दिल्लीतील नातेवाईकांकडे जायचे आहे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल, असेही त्यांनी सांगितले.