लॉकडाउन काळात आपल्या घरी परतणाऱ्या कामगारांवरुन शिवसेना आणि भाजपा या दोन जुन्या मित्रपक्षांमध्ये सध्या चांगलंच राजकारण रंगताना दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी सामना या वृत्तपत्रात, परप्रांतीय कामगारांना भोगाव्या लागणाऱ्या त्रासावरुन उत्तर प्रदेश सरकारचे कान टोचले होते. आपल्या लेखात संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची तुलना हिटलरशी केली होती. शिवसेनेच्या या टिकेला योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिलं आहे.

घाम गाळून महाराष्ट्र उभा करणाऱ्या मजुरांना शिवसेना-काँग्रेस सरकारने फसवलं आहे. लॉकडाउन काळात मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी भाग पाडण्यात आलं. यासाठी उद्धव ठाकरेंना कधीही माफ केलं जाणार नाही, अशा आशयाचं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेश सरकार त्यांच्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. खडतर काळात कर्मभूमी सोडून जाण्यासाठी भाग पाडणाऱ्यांनी कामगारांची चिंता असल्याचं नाटक करु नये. महाराष्ट्र सरकारने सावत्र आई बनूनही या कामगारांना आश्रय दिला असता तरीही यांच्यावर त्यांच्या घरी परतण्याची वेळ आली नसती अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी शिवसेना-काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत.

रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत, करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार काय उपाययोजना करतंय याची माहिती दिली. परप्रांतीय कामगारांना आश्रय द्यायला राज्य सरकार नेहमी तयार होतं, मात्र कामगारांनी घरी जायचं मनाशी पक्क केलं होतं. या कामगारांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी राज्य सरकार रेल्वे, एसटी गाड्यांची सोय करत असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या काही दिवसांत दोन्ही पक्षांमध्ये सोशल मीडियावर हे युद्ध रंगणार अशी चिन्ह दिसतं आहेत.