उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून गोंडा आणि फतेहपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली आहे. फतेहपूरचे जिल्हाधिकारी कुमार प्रशांत आणि गोंडाचे जिल्हाधिकारी जितेंद्र बहादूर सिंह यांना तात्काळ निलंबित केले आहे. फतेहपूरमध्ये अंजनेयकुमार सिंह आणि गोंडामध्ये प्रभांशु श्रीवास्तव यांची जिल्हाधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कुमार प्रशांत आणि जितेंद्र बहादूर सिंह यांच्याविरोधात कामात अनियमितता, अवैध खाण समवेत अनेक प्रकरणांत भ्रष्टाचाराच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. शासनस्तरावर चौकशी करून ही कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी या अधिकाऱ्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली होती. पण त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नव्हती. जेव्हा याची माहिती योगी आदित्यनाथ यांना समजले. त्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेत त्यांना निलंबित केले.

त्याचबरोबर गोंडाचे जिल्हा खाद्य विपणन अधिकारी अजयविक्रम सिंह यांना तात्काळ निलंबित करून याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत आदित्यनाथ म्हणाले की, बहुतांशवेळा छोट्या अधिकाऱ्यांना दंडित केले जाते. पण वरिष्ठ स्तरावर याची जबाबदारी निश्चित केली जात नाही. जर वरिष्ठ स्तरावर प्रभावीरित्या सुनावणी आणि कारवाई केली गेली असती तर असा प्रकार घडला नसता. यापुढे आता वरिष्ठ स्तरावर जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.