उत्तर प्रदेशातील जातीय दंगली पूर्वनियोजित आणि जाणीवपूर्वक कटानुसार घडविण्यात आल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. जातीय दंगलींच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील गरीब जनतेमध्ये फुट पाडण्याचा डाव असल्याचे राहुल गांधी यांनी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला सांगितले. या दंगलीतील सत्य घटनांवर प्रकाश टाकणारी मालिका इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने प्रकाशित केली होती. त्यानंतर लोकसभेत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी या घटनांवर चर्चा करण्याची मागणी केली होती. दंगलीच्या काळात उत्तर प्रदेश पोलिसांनी सांप्रदायिक हिंसेच्या ६०५ घटनांची नोंद केली असून, यापैकी दोन तृतीयांश घटना या आगामी काळात निवडणुका होऊ घातलेल्या १२ मतदारसंघांमध्ये घडल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दलित आणि मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न या दंगलीच्या माध्यमातून होताना दिसत आहे.