बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबरोबरच मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडेही सगळयांचे लक्ष आहे. मध्य प्रदेशात २८ तर उत्तर प्रदेशात सात आणि गुजरातमध्ये विधानसभेच्या आठ जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपा गुजरात आणि उत्तर प्रदेश दोन्ही राज्यात चांगली कामगिरी करेल, असा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात भाजपा पाच ते सहा जागांवर तर गुजरातमध्ये सहा ते सात जागा जिंकेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

यावर्षी जून महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये आठ विद्यमान काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागली. आठपैकी पाच जणांनी भाजपामध्ये प्रवेश केला व ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

उत्तर प्रदेशात सात पैकी चार जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. बसप आणि समाजवादी पार्टी प्रत्येकी एका जागेवर तर मलहानीमध्ये अपेक्ष उमेदवार आघाडीवर आहे. गुजरातमध्ये आठ पैकी सात जागांवर भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत.