देशातील जनता आमच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करेल आणि केंद्रात तिसऱ्यांदा यूपीएचेच सरकार सत्तेत येईल, असा दावा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. राहुल गांधी हेच काँग्रेसचे नैसर्गिक नेते असून आगामी लोकसभा निवडणुकीत ते यूपीएचे नेतृत्व करतील तसेच पंतप्रधान म्हणून आपली जागाही घेतील, अशी अपेक्षाही मनमोहन सिंग यांनी आज व्यक्त केली.
सोमवारी सायंकाळी राष्ट्रपती भवनात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पत्रकारांशी बोलताना मनमोहन सिंग यांनी देशातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य केले. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार धर्मनिरपेक्ष असल्याची प्रशस्ती दिली. मात्र, भाजप-जदयु  युती तुटणे ही अंतर्गत बाब असल्याचे सांगून त्याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला. राजकारणात कोणीही कायमचे मित्र वा शत्रू नसतात. परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ, असे जदयुशी संभाव्य हातमिळवणीविषयी बोलताना ते म्हणाले. राहुल गांधी यांची वारेमाप प्रशंसा करताना ते राष्ट्रीय नेते असून आपली जागा घेऊ शकतात, असे पंतप्रधान म्हणाले. भाजपचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविषयी विचारले असता मोदी कोण आहे हे साऱ्या देशाला ठाऊक आहे, अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले.सातत्याने केंद्र सरकार विविध मुद्यांवरून अडचणीत सापडत असताना पंतप्रधानांची भूमिका मात्र आशावादी आहे.