केंद्रिय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी दरवर्षी हजारो विद्यार्थी अर्ज करतात. त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. एकदा या परीक्षेसाठी केलेला अर्ज हे विद्यार्थी आता मागे घेऊ शकणार आहेत. परीक्षा जवळ आली असून आपला अभ्यास झाला नाही असे एखाद्या विद्यार्थ्याला वाटले तर तो भरलेला परीक्षेचा अर्ज मागे घेऊ शकतो. केंद्रिय लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांना ही सुविधा लवकरच उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे. २०१९ पासून हा निर्णय लागू होणार असून इंजिनिअरींग सेवा परीक्षेपासून याची सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आपण केलेला अर्ज मागे घेता येणार असला तरीही त्यासाठी भरलेली फी मात्र परत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर आपला अभ्यास झाला नाही असे वाटते. मग हे विद्यार्थी अवघड परिस्थितीत अडकतात. विद्यार्थ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन आयोगाने भरलेला फॉर्म परत करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. युपीएससीतर्फे प्रशासकीय सेवांबरोबरच इतर परीक्षाही घेतल्या जातात. यामार्फत विशेष भरतीच्या परीक्षाही घेतल्या जातात. सैन्यदलातील भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या एनडीए आणि सीडीएसच्या परीक्षाही युपीएससीतर्फे घेतल्या जातात. याआधी विद्यार्थी एकदा फॉर्म भरला की तो मागे घेऊ शकत नव्हते. मात्र आता विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे.