भाजपाच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तारूढ असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून (रालोआ) गोरखा जनमुक्ती मोर्चाने (जीजेएम) शनिवारी (दि.२४) फारकत घेतली आहे. या महिन्यात रालोआ सोडणारा हा दुसरा पक्ष ठरला आहे. यापूर्वी तेलुगू देसम पार्टीने (टीडीपी) याच महिन्यात रालोआला रामराम करत भाजपावर आश्वासने न पाळल्याचा आरोपही केला होता. जीजेएमचे नेते एल एम लामा यांनी शनिवारी रालोआ सोडण्याच्या निर्णयाची घोषणा केली. आमच्या पक्षाचा आता भाजपा आणि रालोआशी कुठलाही संबंध नाही. भाजपाने गोरखा लोकांना धोका दिला आहे, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, पश्चिम बंगालचे भाजपा प्रमुख दिलीप घोष यांच्या वक्तव्याने दुखावल्यामुळे जीजेएमने रालोआ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

लामा म्हणाले की, गोरखा लोकांचे स्वप्न हे आमचे स्वप्न आहे असे, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत. पण दिलीप घोष यांच्या वक्तव्याने पंतप्रधान आणि भाजपाची नियत स्पष्ट झाली आहे. घोष यांनी जीजेएमबरोबर फक्त निवडणुकीपुरतीच युती असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आमचा कोणत्याही राजकीय मुद्दयावर समजोता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

गोरखा जनमुक्ती मोर्चाचे नेते एल.एम.लामा

घोष यांच्या वक्तव्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना गोरखा समुदायात निर्माण झाली आहे. भाजपाचे लोक गोरखा लोकांच्या समस्या आणि त्यांच्या संवेदनांप्रती सजग नसल्याचा आरोप त्यांनी केला.

आम्ही युतीचा धर्म निभावताना पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग लोकसभा मतदासंघ भाजपाला दोन वेळा भेट म्हणून दिला. वर्ष २००९ मध्ये येथून भाजपाचे जसवंत सिंह आणि २०१४ मध्ये एस एस अहलूवालिया यांना विजय मिळवून दिला. त्यांना येथून निवडून देण्याचा उद्देश हा होता की, त्यांनी गोरखांच्या समस्या सोडवाव्यात. पण त्यांनी सातत्याने आम्हाला धोका दिला. भाजपामुळे दार्जिलिंग आणि पहाडी प्रदेशात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, गोरखा समाज दीर्घ काळापासून पश्चिम बंगालमधील उत्तरेकडील भागातील पर्वतीय प्रदेशाला गोरखालँड नावाचे वेगळे राज्य करण्याची सातत्याने मागणी करत आहे. मागील वर्षी याच मागणीवरून जीजेएमने दीर्घ काळापर्यंत आंदोलन केले होते.